ठाणे : दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाणे-मुलुंडदरम्यान नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नव्या रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वे, ठामपा, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसेच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत पाहणी केली.
दि. १६ एप्रिल १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या रेल्वे स्थानकात सुरू झाली होती. आज १७० वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांमधील सर्वाधिक गर्दीचे ठाणे स्थानक गणले जात आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज ७ ते ८ लाख प्रवासी ये-जा करीत असतात. आता प्रवाशांचा वाढता भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्याने नवीन रेल्वे स्थानकाची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार राजन विचारे यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत ठाणे महानगरपालिकेने २००८ मध्ये इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन तयार केला. त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानक आवश्यक असल्याचे नमूद केले होते. ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्टेशनचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली त्यानंतर डिसेंबर २०१५ रोजी तत्कालीन ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल असताना ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामास स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून या कामास २८९ कोटी निधीही उपलब्ध करून घेतला. संबंधित विभागाने रेल्वे स्टेशन फलाट व इमारतीसाठी लागणारी ३.७७ एकर जागेची मोजणी करून घेतली.
त्यावेळी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोधे, आसावरी, मध्य रेल्वेचे प्रकल्प निर्माण विभागाचे उपमुख्य अभियंता रिजवान अहमद, कार्यकारी अभियंता सतीशचंद, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुळीक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश परदेशी, तहसीलदार मंडळ अधिकारी शशिकांत जगताप तसेच माजी नगरसेवक संजय दळवी, सहसचिव संजीव कुलकर्णी, युवासेना अधिकारी किरण जाधव विभागप्रमुख स्वप्नील शिरकर, प्रकाश पायरे, अशोक जाधव, राजू शिरोडकर, प्रदीप पूर्णेकर, शाखाप्रमुख रमेश शिर्के, अमोल हिंगे, नाना सावंत व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०२५ पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होणार
रेल्वे व ठाणे महापालिकामधील करारनामा तत्काळ मंजूर करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून ठामपाकडे स्मार्ट सिटींतर्गत उपलब्ध असलेल्या निधीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे व रुळाचे काम सुरू करता येऊ शकेल, यावर अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत करारनामा करण्यात येणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या परिचालन क्षेत्रात एकूण २० पैकी ११ पिलरचे काम पूर्ण झाले आहे. गर्डर व सॅटीस डेकचे काम सुरू असून ३५ टक्के काम पूर्ण झाले आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊन नवे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
विस्तारीत नवे ठाणे रेल्वे स्थानक
संपूर्ण ठाणे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी ३.७७ एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला +२ मजली इमारत उभी राहणार
एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार
या स्थानकात तीन पादचारी पुलाचा समावेश
परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे.
स्टेशन इमारतीसमोर १५० मीटर लांब व ३४ मीटर रुंद असा सॅटिस पूल
चारचाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था
त्यामध्ये स्टेशनला जोडणाऱ्या ३ मार्गिका
मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार तसेच कर्जत-कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार.
ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.