माळशेज घाट रस्त्यावर अपघातात वाढ; डंपरची दुचाकीला धडक, महिलेला चिरडले

मुरबाड-माळशेज घाट रस्ता अपघाताचे केंद्र ठरत असल्याने वाहनचालक, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुरबाड : मुरबाड-माळशेज घाट रस्ता अपघाताचे केंद्र ठरत असल्याने वाहनचालक, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डम्परने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला रंजना मोहन ठोंबरेचा जागीच मृत्यू झाला तर पती मोहन ठोंबरे गंभीर जखमी झाले आहे. सदरची घटना आंबेळा गावाजवळ घडली ठोंबरे पती-पत्नी दुचाकीवरून मुरबाडला येत होती, त्यावेळी हा अपघात घडला. याप्रकरणी डम्परचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मुरबाड-कल्याण-माळशेज नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. गेल्या महिन्याभरात चार-पाच अपघात झाल्याने घाटातून भरधाव वेगाने गौण खनिज घेऊन जाणारे डम्पर तसेच भाजीपाला, कोंबड्या अन्य वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी सतत स्थानिकांकडून केली जात आहे. शनिवारी एका दुचाकीवर मोहन ठोंबरे आणि त्यांची पत्नी रंजना मोहन ठोंबरे मुरबाड येथे जात असताना आंबेळा गावाजवळ त्यांची दुचाकी आली असता भरधाव वेगात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला रंजना मोहन ठोंबरेचा जागीच मृत्यू झाला तर पती मोहन ठोंबरे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी स्थानिकांनी डम्परचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करत आंदोलन केले. स्थानिकांचा राग पाहता पोलिसांनी डम्परचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

मुरबाड-कल्याण-माळशेज घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहतूक होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुरबाड-कल्याण-माळशेज घाटातून दररोज हजारो वाहने येजा करत असतात. त्यामुळे येथे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in