समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजना; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ इंटरसेप्टर वाहने हस्तांतरित

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली.
समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजना; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ इंटरसेप्टर वाहने हस्तांतरित

ठाणे : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. ७०१ किमी लांबीपैकी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समुद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीरदरम्यान वाहतूकीस खुला आहे. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी १५ महामार्ग पोलिसांच्या केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळांकडे केली होती. त्या अनुषंगाने महामंडळाकडून १५ स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या ब्लिंकिंग लाइट बार (लाल-पांढरा-निळा), पीए सिस्टिम, व्हेईकल ग्राफिक्स डिझाइन, प्रथमोपचार साहित्य, आग प्रतिबंधक या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहने अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवी फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, अनिलकुमार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

अशा उपाययोजना सज्ज

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक २१ शीघ्र प्रतिसाद वाहने, २१ रुग्णवाहिका, १४ ईपीसी गस्त वाहने, १३ महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्रे, ३० टन क्षमतेच्या १३ क्रेन, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १४२ सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in