भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरात विविध भागात महापालिकेकडून सिमेंट रस्त्याचे काम केले जात आहे. सिमेंट रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदाराकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. रस्त्यावरून चालताना अनेक नागरिक, वाहनचालक यांचे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात होत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे याकडे महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मीरा-भाईंदर शहरात पूर्वी डांबर टाकून रस्ते बनवले जात होते. त्यामुळे या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत होते. या खड्ड्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी महापालिकेने सिमेंट रस्ते बनवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. तर काही रस्ते महापालिका निधीतून बनवले जाणार असून, काही रस्ते बनवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे. रस्ते बनवण्यासाठी ठेकेदाराला रस्ते बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहेत. शहरात विविध ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहेत.
सिमेंट रस्ते बनवत असताना ठेकेदार निकृष्ट रस्ते बनवत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी ज्या ठिकाणी निकृष्ट रस्ते बनवण्यात आले आहेत त्या ठिकाणी रस्ते तोडून पुन्हा बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी रस्ते तोडून पुन्हा बनवण्यात येत आहेत. काशिमीरा परिसरात प्रभाग १४ मध्ये सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी निकृष्ट काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ठेकेदाराकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.