दरोडा टाकण्यापुर्वीच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

अटक केलेल्या आरोपीकडून चौकशी दरम्यान कबुली, आठ दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात
दरोडा टाकण्यापुर्वीच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

उल्हासनगर :- गेल्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास उल्हासनगर शहरातील एका सिंधी पुजाऱ्याच्या घरात घुसून लहान मुलीच्या गळ्यावर चॉपर ठेवत लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कमेवर दरोडा टाकून गुन्हेगार चार चाकी गाडीतून पळून गेल्याची घटना घडली होती. ही सर्व घटना शेजारच्या सिसिटीव्ही मध्ये कैद झाली होती. या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मुख्य आरोपी शिवा निंबाळकर याच्यासह चार जणांना विविध ठिकाणाहून अटक केली होती. तसेच उल्हासनगर आणि कल्याण क्राईम ब्रांचच्या शाखेने देखील या प्रकरणात चार आरोपी अटक केले होते. दरम्यान अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी करत असताना सदर आठ आरोपी हे पुन्हा अंबरनाथ शहरातील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका राजकीय व्यक्तीच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

जॅकी कोंडूमल जग्यासी हे कॅम्प 4 मधील श्रीराम चौक येथील स्वामी दमाराम दरबारचे पुजारी आहेत. त्यांच्या घरी मंगळवारी भल्या पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास दरबार मधील घरी सशस्त्र दरोडा पडला आहे. सहा ते सात दरोडेखोर तलवारी चॉपर घेऊन त्यांच्या घरात घुसले, त्यांनी घरातील चिराग आणि जॅकी यांना मारहाण केली. जॅकी यांची सात वर्षीय मुलगी जिया हिच्या गळ्यावर तलवार आणि चॉपर ठेवली. जीवे ठार मारण्याचा धाक दाखवत आरोपीनी घरातील तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने आणि 80 हजार रुपयांची रोकड चोरी करून धूम ठोकली होती. विशेष म्हणजे जग्यासी यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर देखील या दरोडेखोरांनी आपल्या सोबत नेला होता.

दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला या प्रकरणात चार आरोपी अटक करण्यात यश मिळाले होते. मुख्य आरोपी शिवा निंबाळकर, अनिल दुधानी, सुनील कुरणे आणि राजकुमार कुरणे अशी अटक केलेल्या आरोपीची नावे असून सर्व आरोपी अंबरनाथमध्ये राहत असल्याचे पोलीसांनी सांगितले. तसेच एक आरोपी कर्नाटक, दोन आळेफाटा आणि एक आरोपी अंबरनाथ येथून अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, महेंद्र सपकाळे, प्रियांका सादळकर, रामदास मिसाळ, जितेंद्र चित्ते, पांडुरंग पथवे, समीर गायकवाड, गणेश राठोड, कृपाल शेकडे, गणेश डमाळे, हनुमंत सानप, मंगेश वीर यांच्यासह पोलीस पथकाने महत्वाची भुमिका बजावली होती.

दुसरीकडे उल्हासनगर आणि कल्याण शाखेच्या क्राईम ब्रांच पथकाने देखील या दरोड्याच्या गुन्ह्यात अकबर खान, असिफ शेख, शिवसिंग शिकलकर, राहुलसिंग जुनी यांना अटक करून विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अटक करण्यात आलेल्या आठ ही आरोपीची कसून चौकशी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक करत होते. या चौकशी दरम्यान सदर आरोपी हे अंबरनाथ शहरातील एका व्यवसायाने डॉक्टर असलेल्या राजकीय व्यक्तीच्या घरी दरोडा टाकणार असल्याचे त्यांनी कबूल केले. यासाठी त्यांनी तेथील परिसराची रेकी देखील केली असल्याचे पोलिसांना सांगितले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या या सतर्कतेमुळे घडणारा गुन्हा टाळल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आज या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होते. या पत्रकार परिषदेत अटक आरोपीची माहिती देताना अनिल दुधानी याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात तब्बल 17 गुन्हे, अकबर खान याच्या विरोधात 4 गुन्हे, शिवसिंग शिकलकर याच्या विरोधात 12 गुन्हे, शिवा निंबाळकर याच्या विरोधात एक गुन्हा, राहुलसिंग जुनी याच्या विरोधात 4 गुन्हे आणि अशीफ शेख याच्या विरोधात 3 गुन्हे दाखल असल्याचे पोलीसांनी सांगितले.

तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्ट पद्धतीने गुन्ह्याचा तपास करून आरोपी अटक केल्याप्रकरणी त्यांना 35 हजार रुपयांचे रिवॉर्ड तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in