महावितरण व वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावास

महावितरण व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला कल्याण येथील प्रथमवर्ग न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे
महावितरण व वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावास

वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीज ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे जमा करायचा आणि महावितरण व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला कल्याण येथील प्रथमवर्ग न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. साहिल असगर पटेल असे या आरोपीचे नाव असून मुळचा तो राहणारा कल्याण पाश्चिम मधील बिस्मिल्ला हॉटेलजवळ, मौलबी चौक, गोविंदवाडी येथे आहे. त्याने आतापर्यंत एकूण २३ ग्राहक व महावितरणची २ लाख ४० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे न्यायलयाने आरोपीला भादविच्या कलम ४२० नुसार एक वर्ष कारावास व एक हजार रुपयांचा दंड आणि कलम ४०६ नुसार सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

कल्याण पश्चिम विभाग अंतर्गत विविध चार बिल भरणा केंद्रात येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचा बहाणा करून आरोपीने या ग्राहकांकडून रोख रक्कम घेतली. ही रक्कम हडप करून आरोपीने संबंधित ग्राहकांच्या वीज बिलापोटी स्वतःच्या व रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा धनादेश बिल भरणा केंद्रात जमा करून ग्राहकांना त्याची पावती दिली. परंतु हे धनादेश न वटल्याने कल्याण पश्चिम विभाग कार्यालयात परत आले आणि आरोपीचे कारस्थान उघडकीस आले. त्यानुसार वित्त व लेखा विभागाचे उप व्यवस्थापक गजानन राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून महात्मा फुले चौक पोलिसांनी मार्च २०२१ मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. ए. आर. शेख यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तपासी अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक डी. एन. ढोले आणि सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भादविच्या कलम ४२० नुसार एक वर्ष कारावास व एक हजार रुपयांचा दंड आणि कलम ४०६ नुसार सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in