ठाणे : दिव्यांगांसाठीचा असलेला निधी हा लाडक्या बहिणींकडे वळवला असल्याचा गंभीर आरोप प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने केला आहे. दिव्यांगांना देण्यात आलेल्या स्टॉलच्या बाजूला झालेले अतिक्रमण आणि दिव्यांगांच्या घरकुल योजनेत ५ टक्के घरे राखीव ठेवावी, अशा मागण्यांसाठी सोमवारी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव ठाणे महापालिकेवर धडकले. यावेळी दिव्यांग बांधवांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली तर पालिकेसमोरील रस्ता अडवण्याचा प्रयत्नही केला. या आंदोलनामुळे पालिका मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
विविध मागण्यांसाठी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर सोमवारी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी दिव्यांगांसाठी निधीची तरतूद केली जाते. मात्र गेले दोन वर्ष हा निधी दिव्यांगांना देण्यात आलेला नाही. हा निधी दिव्यांगांना न देता लाडक्या बहिणींकडे वळवण्यात आला असल्याचा गंभीर आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या सर्व मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर जमा झाले होते. यावेळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिव्यांगांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवले होते. तर यावेळी पालिकेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी देखील केली.
दिव्यांगांना दिलेल्या स्टॉलभोवती अतिक्रमण
ठाणे महापालिकेने जे दिव्यांगांना स्टॉल दिले होते त्यापैकी काही स्टॉलच्या बाजूला अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे स्टॉल चालवायचे कसे असा प्रश्न दिव्यांगांना पडला आहे. याशिवाय पालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी जी घरकुल योजना राबवण्यात येते त्यासाठी ५ टक्के घरे राखीव ठेवावी अशी मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दरवर्षी दिव्यांगांसाठी निधीचे तरतूद करण्यात येत असून ती दिव्यांगांना दिली जात आहे. याशिवाय ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे त्या ठिकाणी कारवाईसाठी पत्र देण्यात आले आहे.
प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त