पायाने पीठ तुडवणाऱ्या दुकानावर अन्न व सुरक्षा प्रशासनाची कारवाई

मिठाई विक्रीच्या दुकानातील कारागीर हा समोसा व कचोरीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पिठाला पायाने तुडवतानाचा संतापजनक प्रकार व्हिडिओमुळे चव्हाट्यावर आल्यावर...
पायाने पीठ तुडवणाऱ्या दुकानावर अन्न व सुरक्षा प्रशासनाची कारवाई

उल्हासनगर : मिठाई विक्रीच्या दुकानातील कारागीर हा समोसा व कचोरीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पिठाला पायाने तुडवतानाचा संतापजनक प्रकार व्हिडिओमुळे चव्हाट्यावर आल्यावर व गावकऱ्यांनी दुकानावर धडक देऊन दुकानातील साहित्य फेकून दिल्याचा प्रकार उल्हासनगरात उघडकीस आला होता. या प्रकाराची दखल घेऊन अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या अधिकारी अरुणा विरकायदे यांनी दुकानातील खाद्य पदार्थांचे नमुने घेतले असून दुकान बंद करण्याची नोटीस दुकानदाराला बजावली आहे.

आशेळेगाव प्रवेशद्वारावर गेल्या १५ वर्षांपासून हरिओम स्वीट नावाचे दुकान आहे. या दुकानात मिठाईसोबत समोसे, कचोरी, वडापाव, ढोकला आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात. जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या वेशीवर हे एकमेव गोड व खाद्य पदार्थ विकणारे दुकान असल्याने अख्खे आशळेगाव या दुकानातून मिठाई खरेदी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. अशात दुकानातील कारागीर हा समोसे,कचोरीचे पीठ पायाने तुडवतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

या प्रकाराने संतप्त झालेल्या गोपी कडू, अंकुश कडू, परेश तरे, नितीन तरे, योगेश म्हात्रे, गोपाळ कडू, अशोक कडू, तात्या कारकर, मनीष तरे आदी गावकऱ्यांनी सोमवारी दुपारी हरिओम स्वीट दुकानावर धडक दिली. यावेळी दुकानदाराला जाब विचारला असता कारागिराने ही चूक केली असल्याचे मान्य केले होते. मात्र पायाने पीठ तुडवण्याचा प्रकार हा गंभीर असल्याने विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी अन्न व सुरक्षा प्रशासनाला कळवले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in