ठाणे : ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरांना अमली पदार्थमुक्त शहरे करण्यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील पब आणि लेडीज बारवर कारवाई कारण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी सकाळीच ठाण्यात एकाचवेळी नऊ प्रभाग समिती क्षेत्रात कारवाईला सुरुवात करण्यात आली. घोडबंदर पट्ट्यात दोन, तर तीन हात नाका परिसरातील एक असे तीन लेडीज बार बुलडोजर लावून जमीनदोस्त करण्यात आले. पोलीस प्रशासन आणि महापालिका अशा दोघांकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली.
पुण्यात घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात असलेल्या अनधिकृत लेडीज बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अधिवेशनात सरकारला घेरण्याचा विरोधकांचा डाव पलटवून लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच कारवाईचे आदेश दिल्याने महापालिका ठाणे महापालिका प्रशासन चांगलेच कामाला लागले.
ठाणे महापालिका क्षेत्रात सकाळी या कारवाईला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये घोडबंदर रोडवरील ओवळा नाका या ठिकाणी असलेल्या मयुरी लेडीज बारवर महापालिकेच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने मयुरी लेडीज बार संपूर्ण जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरच असलेला खुशी या लेडीज बारवर देखील कारवाई करण्यात आली. हा लेडीज बार देखील पूर्णपणे भुईसपाट करण्यात आला. तर तीन हात नाका परिसरात असलेला पांचाली बार देखील तोडून टाकण्यात आला आहे. ठाण्यातील नऊ प्रभाग समितीक्षेत्रात एकाचवेळी ही कारवाई करण्यात आल्याने पब आणि लेडीज बारचे धाबे दणाणले आहेत.
पुण्यातील काही तरुण अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले होते. यांची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्येही त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीनही शहरांमध्ये कारवाईला सुरुवात झाली आहे. मात्र कारवाईनंतरही ठाण्यात पुन्हा पब आणि लेडीज बार सुरू होत असल्याने प्रशासनाची ही कारवाई नियमित राहणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
'महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा'
पुण्यातील पब आणि बारवर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ठाणे पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना समाजमाध्यमांवर एक पोस्ट प्रसारित केली आहे. या पोस्टमध्ये ड्रग माफियांचा कर्दनकाळ 'महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा' अशी मुख्यमंत्र्यांची ओळख करून देताना जनता आपल्या पाठीशी आहे, अशीच कारवाई करत रहा, असा संदेश लिहिलेला आहे. या मजकुराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्या हातात हातोडा आणि त्यांच्या मागे बुलडोझर असे चित्र देखील रेखाटले आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सरनाईकांची ही पोस्ट चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.
पब आणि लेडीज बारवर पोलिसांकडून यापूर्वी देखील कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पब आणि बारमध्ये अनधिकृत बांधकाम केले असल्याचे निदर्शनास आले होते. अमली पदार्थांची विक्री या ठिकाणी होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई अधिक सक्षमपणे होण्यासाठी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. ठाणे, भिवंडीमध्येही ही कारवाई करण्यात येत आहे. - ज्ञानेश्वर चव्हाण, सहपोलीस आयुक्त, ठाणे
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत लेडीज बार आणि पबवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमबाह्य उद्योग सुरू असल्याच्या तक्रारी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या होत्या. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू करण्यात आली असून पुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे. - गजानन गोदापुरे, उपायुक्त, ठा.म.पा
डोंबिवलीत देखील कारवाई
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लर यांच्यावर कारवाई केली जात आहे. याप्रकरणी पोलीस विभागाने अनधिकृत बार, ढाबे आणि गुटखा पार्लर यांच्या यादी तयार केली असून ती यादी महापालिकेला देखील देण्यात आली आहे.
शहरातील अनधिकृत बार, ढाबे आणि गुटखा पार्लरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्याभरात तीव्र गतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी गुरुवारी पत्रकार परीषदेत दिली
गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, महापालिकेच्या सर्व प्रभागाचे सहा.आयुक्त व इतर अधिकारी वर्ग यांच्याबरोबर एक बैठक घेतली.
या बैठकीत परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिका विभागीय उपआयुक्त, कल्याण व डोंबिवलीतील सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, महापालिकेच्या सर्व प्रभागाचे सहा. आयुक्त व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बार, गुटखा पार्लर, ढाबे, टपऱ्या व इतर ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जाते, अशा ठिकाणी त्वरित कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. या संदर्भात महापालिकेच्या प्रभागातील सहा. आयुक्तांनी यापूर्वीच नोटिसा बजाविल्या असून पुढील कार्यवाही आता सुरू करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.