दिव्यातील शासनाची मंजुरी नसलेल्या शाळांवर होणार कारवाई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मान्यतेशिवाय कोणत्याही प्रकारची शिक्षण संस्था सुरु करणे बेकायदेशीर आहे
दिव्यातील शासनाची मंजुरी नसलेल्या शाळांवर होणार कारवाई

दिवा येथे शासनाची कोणतीही मंजुरी न घेता भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये चक्क इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आलेले आहेत. भावी काळात या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतरत्र प्रवेश मिळण्याची शक्यता नसल्याने या शाळांवर कारवाई करुन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन करावे, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केली आहे. राजाभाऊ चव्हाण यांनी यासंदर्भात शिक्षणाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे. मात्र, या निवेदनास १० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कारवाई होत नसल्याने राजाभाऊ चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मान्यतेशिवाय कोणत्याही प्रकारची शिक्षण संस्था सुरु करणे बेकायदेशीर आहे. असे असतानाही गणेश मंदिर जवळ, साबेगाव दिवा (पूर्व) येथे होली एंजेल इंग्लिश स्कूल आणि एस. एस. मेमोरयिल इंग्लिश स्कूल या बेकायदेशीर शाळा जून २०२२ या शैक्षणिक वर्षापासून सुरु केल्या आहेत. या शाळा सुरु करण्यासाठी संबधित शिक्षण माफियांनी २ ते ४ बेकायदेशीरपणे बांधकाम झालेल्या खोल्या भाडेतत्वावर घेतल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये या दोन्ही शाळांमध्ये सुमारे ३००विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा बेकायदा असल्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात. शिक्षण अधिकार कायदा कलम १८ आणि कलम १८ (५) अन्वये अशा पद्धतीने बेकायदेशीपणे शाळा सुरु करणे आणि ती चालू ठेवणे हे दंडनिय अपराध आहे. त्यामुळे या शाळांवर तसेच शाळा चालकांवर उपरोक्त कायद्यानुसार तसेच पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्था चालकांवर ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात तक्रार अर्ज देऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, प्रशासन कारवाई करीत नसल्याने नाईलाजास्तव आम्हांस आंदोलनाचा मार्ग अनुसरावा लागेल, असा इशाराही राजाभाऊ चव्हाण यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in