अट्टल घरफोडी करणारे चोर गजाआड; तीन दिवसांत सहा घरफोड्या केल्या

मूळचा नांदेडचा असलेला राजू मिरे हा नेवाळी येथे बहिणीच्या घरी आला होता.
 अट्टल घरफोडी करणारे चोर गजाआड; तीन दिवसांत सहा घरफोड्या केल्या
Published on

भाचीच्या वाढदिवसाला आलेल्या मामाने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने तीन दिवसांत सहा घरफोड्या केल्या. पोलिसांच्या सूत्राने दिलेल्या माहितीच्या आधारे, नेवाळी गावातील चाळीतून चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा घरफोडीत चोरी केलेले साडे बारा लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.

मूळचा नांदेडचा असलेला राजू मिरे हा नेवाळी येथे बहिणीच्या घरी आला होता. तिथे त्याने त्याचा सहकारी परमेश्वर गायकवाड, प्रकाश पवार आणि एका अल्पवयीन सहकाऱ्यांच्या मदतीने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली. अवघ्या तीन दिवसांत सहा घरफोड्या झाल्याने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक आयुक्त जगदीश सातव, मोतीचंद राठोड यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींना गजाआड करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, ज्ञानेश्वर माळी, पोलीस हवालदार अजय गायकवाड, पोलीस नाईक प्रमोद कांबळे, चंदू शिंदे, गौतम कारकुड, बाबू जाधव, सुभाष घाडगे, नवनाथ काळे याना तपासाचे आदेश दिले. माहिती तपासल्यानंतर पोलीस पथकाने नेवाळी गावातील चाळीत धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली. या आरोपींपैकी राजू मिरे याचे विरुद्ध तेलंगणा राज्यात सात गुन्हे आणि परमेश्वर गायकवाड याच्या विरोधात नांदेड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in