डोंबिवली : दिवा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या जाणवत आहे. पाण्याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली आली. या बैठकीत एमआयडीसीला पाणीपुरवठा योग्य दाबाने वाढवावा असे निर्देश देण्यात आल्याने दिवा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथला अतिरिक्त पाणीपुरवठा होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात विशेषतः नांदिवली टेकडी परिसर, भोपर, देसलेपाडा, सोनारपाडा, दावडी, पिसवली या भागांमध्ये मागील काही महिन्यात अधिक दाबाने पाणी येत होते. येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन या भागांना एमआयडीसीकडून महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा संपूर्ण दाबाने सोडण्यात यावा, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील जनतेला दहा एमएलडी अधिक पाणी वाढवण्याचा तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जनतेसाठी दिवाळीच्या काळात जो पाण्याचा दाब ठेवण्यात येतो. तोच दाब (प्रेशर) सध्या मेंटेन करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या भागातील पाणीपुरवठा कशा पद्धतीने सुरळीत होऊ शकेल या दृष्टीने एमआयडीसीने आपला डीपीआर येत्या दोन महिन्यांमध्ये तयार करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.
पलावा लोधा गृह संकुलात राहणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी व्यावसायिक दर लागू करण्याऐवजी निवासी दर लागू करण्यात येणार आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेने कार्यवाही करावी यांसह सर्व शहरातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्तरीत्या काम करावे. अशा सर्व सूचना आणि निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, एमआयडीसीचे सीईओ बिपीन कुमार शर्मा तसेच सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, युवासना राज्य सचिव दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक गजानन पाटील, रवी म्हात्रे, भाग प्रमुख अनिल म्हात्रे, विकास देसले, नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते….