अग्निशमन दलास मिळणार पुरेसे मनुष्यबळ

सुमारे वर्षभरापूर्वी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनीही लवकरच हंगामी तत्वावर अग्निशमन दलाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले
अग्निशमन दलास मिळणार पुरेसे मनुष्यबळ

बदलापूर: गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मनुष्य बळावर काम करणाऱ्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला नववर्षात २८ नवे कर्मचारी मिळणार आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला आता अधिक सक्षमपणे काम करणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या दीड दोन दशकात बदलापूर शहरात गृहसंकुले वाढली असून शहर झपाट्याने विस्तारत आहे. सद्यस्थितीत बदलापूरची लोकसंख्या तीन-चार लाखांच्या घरात पोहचली आहे. शहराच्या भागाभागात उभी राहत असलेली मोठमोठी गृहसंकुले पाहता आगामी काळात ही लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे आग वा तत्सम दुर्घटनाप्रसंगी नागरिकांना मदत व बचावकार्य करण्यासाठी अग्निशमन दल सक्षम असणे आवश्यक आहे. बदलापुरातील एमआयडीसीत अनेक कंपन्या असून अधूनमधून आगीसारख्या दुर्घटना होत असतात. त्यात शहरात निर्माण होत असलेल्या पूर्वपरिस्थितीतही पूरग्रस्तांना मदत व बचावकार्यात अग्निशमन दलाची भूमिका महत्त्वाची ठरत असते.

बदलापुरात पूर येणे ही नवी गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहता एखाद दुसरे वर्ष वगळता दरवर्षी पावसाळ्यात बदलापूरच्या सखल भागाला पुराचा फटका बसून नागरिकांचे नुकसान होत असते. त्यामुळे पावसाळ्यात अग्निशमन दलाला सज्ज रहावे लागते. आतापर्यंत शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत अग्निशमन दलाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. कारण मनुष्यबळाची कमतरता असतानाही अग्निशमन दलाने चांगले काम केले आहे. परंतु तरीही मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे अग्निशमन दलाची होत असलेली दमछाकही लपून राहिलेली नाही.

पूर्वी कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रांत एमआयडीसी येथे एकच अग्निशमन केंद्र होते. परंतु शहराचा वाढता विस्तार व झपाट्याने वाढणारी लोकसंख्या याचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली भागातही आणखी एका अग्निशमन केंद्राची उभारणी केली. अग्निशमन दलाच्या दैनंदिन कामकाजासाठी एक लिपिक व एक शिपाईही आवश्यक आहे. अग्निशमन विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषद प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याने अग्निशमन दलाला तुटपुंज्या मनुष्यबळावरच कारभाराचा गाडा हाकावा लागत होता.

सुमारे वर्षभरापूर्वी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनीही लवकरच हंगामी तत्वावर अग्निशमन दलाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. अलीकडे या संदर्भातील हालचालींना वेग आला असून अग्निशमन दलाला लवकरच २८ नवे कर्मचारी मिळणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.

अग्निशमन दलासाठी २८ कर्मचारी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या लेखा विभागाकडे असलेला हा प्रस्ताव लवकरच मुख्याधिकाऱ्यांकडे जाणार असून त्यांची स्वाक्षरी होताच निविदा प्रक्रिया केली जाणार आहे.

-भागवत सोनोने, अग्निशमन अधिकारी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in