हिंमत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्यासमोर निवडणुकीला उभा राहतो; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आव्हान

ठाण्यातील मनोरमा नगर येथील सभेत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मिंधे आपल्यात नव्हते त्यापेक्षा जास्त आता ताकद वाढत आहे.
हिंमत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्यासमोर निवडणुकीला उभा राहतो; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आव्हान

ठाणे : हिंमत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्यासमोर निवडणुकीला उभा राहतो, असे आव्हान उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील बालेकिल्ल्यात केले. मिंधे दिल्लीसमोर लोटांगण घालत आहेत. हा स्वाभिमानी महाराष्ट्र सहन करणार नसल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्रात जनसंवाद दौरा सुरू असून रविवारी त्यांनी ठाण्याचा विविध भागात हा दौरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आणि विशेष करून शिंदेंच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे यांनी उबाठा गटाच्या शाखांचे उद्घाटनही केले. अनेक शाखांना भेट देत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत बैठकाही घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी, पाचपाखाडी मतदारसंघातील जिजामाता नगर येथील नव्या शाखेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले

ठाण्यातील मनोरमा नगर येथील सभेत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मिंधे आपल्यात नव्हते त्यापेक्षा जास्त आता ताकद वाढत आहे. चोरांनी शाखा, पक्ष, चिन्ह चोरण्याचा प्रयत्न केला, ठाकरे पण नाव चोरतील. शिंदे गटासोबत त्यांनी भाजपवरही टीका केली. भाजपने ३ पक्ष फोडले, परिवारामध्ये भांडणं लावली. मिंधे म्हणजे स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी लढणारे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत मशाल हा अंधार दूर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरेंचे आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, अरे शिवसेना झिंदाबाद, अशा जोरदार घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

ठाणे आपले, शिवसेना ठाण्याची

महाराष्ट्रात गुंडाराज सुरू झाला आहे. टोळ्या निर्माण केल्या जात आहेत. गेल्या २ वर्षांत महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. येत्या काळात माणूस म्हणून तुम्ही अपयशी ठरणार. तुमचे फक्त कपडे पांढरे आहेत, पण मन मात्र काळे आहे हे तुम्ही सिद्ध केले आहे. हे ठाणे आपले आहे, ही शिवसेना ठाण्याची आहे. या ठिकाणी आपणच जिंकणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in