मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रशासन सज्ज; २८ नागरी आरोग्य केंद्रातही मदत कक्ष स्थापन

केडीएमसी पालिकेतर्फे ३६६ कक्ष स्थापन. पाच लाख पत्रकांचे आशा वर्कर यांच्यामार्फत वाटप. २८ नागरी आरोग्य केंद्रातही मदत कक्ष स्थापन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रशासन सज्ज; २८ नागरी आरोग्य केंद्रातही मदत कक्ष स्थापन
Published on

कल्याण : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने राज्यातील पालिका, नगरपंचायत सज्ज झाल्या आहेत.

कल्याणमध्ये निवडणूक प्रभाग निहाय १२२ प्रभागात प्रत्येकी ३ या प्रमाणे ३६६ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे २८ नागरी आरोग्य केंद्रातही मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने कल्याण व डोंबिवली येथील नाट्यगृहात मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जांची वॉर्डनिहाय तपासणी होऊन पात्र महिलांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त इंदु राणी जाखड यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कल्याण-डोंबिवलीत यशस्वीपणे राबविण्यासाठी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग, कल्याण व महापालिकेतील कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याबाबत व ‘नारीशक्तीदूत’ या ॲपबाबत माहिती देण्यात आली. सदर योजनेची माहिती सर्व स्तरातील महिलांना होण्याकामी महापालिकेच्या वतीने पाच लाख पत्रके छापण्यात आलेली असून आशा वर्कर यांच्यामार्फत सदर पत्रके वाटण्यात आलेली आहे. याकरीता महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागांमध्ये सदर योजनेचा अर्ज भरण्याकरिता व माहिती मिळणेकरीता स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील सदर योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. तसेच सदर कर्मचारी यांचेवर नियंत्रण ठेवणेकामी समाज विकास विभागाकडील ८ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील सदर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याकरिता महापालिकेत समाज विकास विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या NULM चे व इतर बचत गटांतील सर्व महिलांकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.

प्रत्येक अर्जापोटी ५० रुपयांचे मानधन

बचत गटातील सचिव यांची या योजनेचे दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रत्येक प्रभागाकरिता बचत गटातील १० महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना प्रत्येक अर्जापोटी रक्कम रुपये ५०/- इतके मानधन महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. महापालिकेतील विविध प्रभागातील कर अधीक्षक यांना समन्वय अधिकारी (Nodal Officer) म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील झेापडपट्टी विभागांमध्ये सदर योजनेची माहिती तसेच प्रचार व प्रसार होण्याकरिता शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रभागांतील नागरी सुविधा केंद्र येथे ऑॅफलाईन अर्ज भरण्याकरिता अर्ज उपलब्ध करून दिलेले आहेत.

ठाण्यात सर्व प्रभाग समित्यांमध्ये मदत कक्ष सुरू

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना सुरू झाली आहे. ही योजना सर्वदूर पोहोचावी आणि जास्तीत जास्त महिलांनी यांचा लाभ घ्यावा, यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीस्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची कार्यवाही सुनियोजित व गतिमानरीतीने व्हावी याकरिता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार प्रभाग समितीस्तरावर तयार करण्यात आलेल्या मदत कक्षामध्ये अर्ज वितरण व स्व‍ीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून अंगणवाडी मदतनीस व सेविका यांच्या माध्यमातून ऑनलाईन ॲपमध्ये अपलोड करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपायुक्त (समाज विकास विभाग) अनघा कदम यांनी दिली.

डोंबिवलीत शिवसेनेतर्फे शिबीर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ डोंबिवलीतील लाडक्या बहिणींना घेता यावा, यासाठी पूर्वेकडील टंडन रोडवरील प्रगती कॉलेज सभागृहात डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसांचे हे शिबीर असून शनिवारपासून लाभार्थी महिला अर्ज घेण्यासाठी शिबिराला भेट देत आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची सरकारी सेतू कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती ठेवण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारी सर्टिफिकेट नसतील तर त्यासाठी सरकारी सेतू कार्यालयाचे कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरात डोमेसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला मिळण्याची व्यवस्था केली आहे. याबाबत राजेश मोरे यांनी सांगितले की, दोन दिवसांच्या शिबिराचा मुख्य उद्देश महिलांना कोणतीही अडचण येऊ नये. प्रत्येक लाभार्थी बहिणीला या योजनेचा लाभ घेता यावा. यासाठी आमचे पदाधिकारी मेहनत घेत असून दोन दिवसांत हजारो महिलांना या योजनेचा लाभ निश्चित मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in