ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी २ हजार सार्वजनिक, तर ४० हजार घरगुती गणपतीचे विसर्जन होणार असून यासाठी ठाणे शहर, ग्रामीण आणि भाईंदर अशा तीनही शहरांमध्ये १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय गणपतींच्या मिरवणुकांवर ड्रोन कॅमेरा तसेच दुर्बीणचाही वॉच ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आपल्या आवडत्या बाप्पाला मंगळवारी भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीवेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचे सर्व उपाय योजले असून जिल्ह्यात तब्बल १५ हजाराहून अधिक पोलीस फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय वैद्यकीय पथक, होमगार्ड, स्वयंसेवक यांची मदत घेण्यात येणार असून ते देखील सज्ज असल्याचे म्हटले जात आहे. जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला सुमारे दोन हजार सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन पूर्ण होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी १० पासूनच गणेश मंडळांच्या मिरवणुका निघण्यास सुरुवात होईल. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीवर व विसर्जन घाटांवर सीसीटीव्हींची करडी नजर राहणार आहे. तसेच गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग केला जाणार आहे.
कृत्रिम विसर्जन घाटाची निर्मिती
अनंत चतुर्थीनिमित्त मंगळवारी ठाणे जिल्ह्यात सुमारे दोन हजार सार्वजनिक तर ४० हजारांहून अधिक खासगी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी स्थानिक महापालिकेतर्फे ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन घाट निर्माण करण्यात आले आहेत. ठाणे शहर आयुक्तालयात विसर्जन काळात सात पोलीस उपायुक्त, १६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ८४ पोलीस निरीक्षक, ४०० सहाय्यक/उपपोलीस निरीक्षक, ४ हजार पोलीस अमलदार, चार एसआरपीएफ कंपन्या, आरएएफ कंपनी असा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. त्याव्यतिरिक्त बॉम्बशोधक व नाशक पथक, घातपातविरोधी पथक नेमण्यात आली आहेत.
ठिकठिकाणी तपासणी नाके
मुख्य विसर्जन मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी मनोरे उभारून टेहळणी करण्यात येणार आहे. तसेच मुख्य मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी काही इमारतींची छते प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. मिरवणुकीचे छायाचित्रण होणार असून मिरवणुकीत आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची साध्या वेशातील पोलीस पथके कार्यरत असणार आहेत. तसेच दुर्बिणीद्वारे देखील गर्दीतील हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच जीप, वायरलेस, वॉकीटोकी, गॅस गन आणि बॅरिगेट्स आदी अतिरिक्त साहित्य ठाणे पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.