भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या कर निर्धारण विभागातील सुमारे शेकडो कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने महापालिकेची कर वसुली पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे करदात्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या महापालिकेच्या खात्यात ६ लाखांपेक्षा कमी कर जमाहोत असल्याने महापालिका प्रशासनाची अवस्था आणखीनच बिकट होत आहे.
भिवंडी महापालिका कर आकारणी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेची जुनी आणि नवीन मिळून एकूण ७१३ कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, या वसुलीसाठी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी १२५ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी मेहनत करूनही एप्रिल ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे २६ कोटी रुपये वसूल होऊ शकली. या शिवाय दोन दिवसांनी अभय योजनाही राबविण्यात आली. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर १ कोटी ३० लाख रुपयांचा कर वसूल झाला आहे. त्यापैकी बहुतांश कर निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी भरल्यामुळे हा आकडा वाढला आहे. सध्या कर मुल्यांकन कार्यालयात एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र इतर कर्मचारी वसुलीला जात असल्याने सध्या केवळ दोनच महिला कर्मचारी कार्यालयात काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांच्या विभागाचे काम ठप्प झाले आहे.जे कर भरण्यासाठी येतात त्यांना कर जमा करणेही शक्य होत नसल्याने थकीत कराची वसुली कमी झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष
वास्तविक दररोज ६ लाख रुपयांच्या आसपास वसुली होत असते. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये महापालिकेच्या खात्यात जमा झाले आहेत, जे अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कर भरण्यात अडचण येत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयात निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी गेल्याचे कारण सांगितल्याने नागरिकांना कर न भरताच परतावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या कर आकारणी विभागासह पाचही विभागीय समिती कार्यालयातील शंभरहून अधिक भूभाग लिपिक व कर आकारणी विभागाचे कर्मचारी निवडणूक कामांसाठी रूजू झाले आहेत. त्यामुळे कार्यालये ओस पडली आहेत.
- सुधीर गुरव, कर निर्धारण विभाग प्रमुख भिवंडी महापालिका
नवी मुंबईत दैनंदिन कामाला फटका!
नवी मुंबई : महापालिकेचे बहुतांश कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला गेल्याने शहरातील दैनंदिन कामावर त्याचा परिणाम झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे १ हजार २०० हून अधिक कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. आहे.
या कर्मचाऱ्यांना बी.एल.ओ., केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी, भरारी पथक, कार्यालयीन कामकाज कर्मचारी, मतदान जनजागृती, शिपाई आदी कामांसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मागील दोन महिन्यांपासून यातील अनेक कर्मचारी ऐरोली-बेलापूर यासह अन्य विधानसभा कार्यालयात दैनंदिन कामाकरिता नियुक्त केले आहेत.
उरणमधील कार्यालयात शुकशुकाट
उरण : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना जुंपल्याने शासकीय कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयाबाहेर नागरिकांची गर्दी होत असून त्यांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागत आहेत.
निवडणुकीच्या कामात पालिकेच्या आपत्कालीन, रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिनी, मलनिःसारण जलवाहिनी विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग करून घेतल्याने नगरपरिषद, ग्रामपंचायत, महसूलच्या कामकाजासह पायाभूत सुविधांवर देखील परिणाम होत असून अनेक ठिकाणी शासकीय कामे ठप्प पडली आहेत.
आगामी उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल, नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या सुमारे २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
आता जिल्हाधिकारी कार्यालयांकडून कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती केली जात असल्यामुळे या कामातून कोणाचीही सुटका होत नाही. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी आणि कर्मचारी, तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, शिपाई तर पंचायत समिती कार्यालयातील बिडीओ, गट शिक्षण अधिकारी आणि कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या निवडणुकीच्या कार्यात जुंपल्याने कार्यालये ओस पडली असून सर्व शासकीय कामे ठप्प झाली आहेत.