१५ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाला कोपरीतील ४७ कुटुंबांना निवारा!

बीएसयूपी योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रे असूनही महापालिकेने अपात्र ठरविलेल्या कोपरीतील ४७ कुटुंबांना अखेर तब्बल १५ वर्षांनंतर निवारा मिळाला आहे.
१५ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाला कोपरीतील ४७ कुटुंबांना निवारा!

ठाणे : बीएसयूपी योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रे असूनही महापालिकेने अपात्र ठरविलेल्या कोपरीतील ४७ कुटुंबांना अखेर तब्बल १५ वर्षांनंतर निवारा मिळाला आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी घरांसाठीची लढाई जिंकली असून, रेंटल हौसिंगमधील घराची कागदपत्रे नुकतीच मिळाल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

ठाणे महापालिकेकडून कोपरीतील सिद्धार्थ नगर येथे बीएसयूपी योजना राबविण्यात येत होती. या घरांसाठी रहिवाशांकडून १५ महिन्यांपासून प्रतिक्षा केली जात होती. या इमारतींमध्ये घर प्रदान करण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ८६ कुटुंबांची लॉटरी काढण्यात आली होती; मात्र, सर्व आवश्यक कागदपत्रे असूनही ४७ कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर या रहिवाशांच्या मदतीला भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण धावून गेले. त्यांनी महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याचबरोबर भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्याकडेही रहिवाशांच्या वतीने दाद मागितली. अखेर महापालिकेकडून पुन्हा कागदपत्रे जमा करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी सर्व रहिवाशांनी पुन्हा कागदपत्रे जमा केली. त्यानंतर या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, यासाठी भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधत सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या. त्यानंतर सध्या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल हौसिंगमध्ये घरे देण्याचे शनिवारी मान्य करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in