४० वर्षे कष्ट करून त्यांनी पक्ष वाढवला ‘एकनाथ शिंदे यांचे काय चुकले? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना सवाल

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिंदे यांच्या निवासस्थानी शनिवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

‘गेली ४० वर्षे एकनाथ शिंदे यांनी कष्ट करून पक्ष वाढवला, राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. पक्ष वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतली, प्रत्येकाला नगरविकास खात्यातून निधी दिला,’असे सांगत शिंदे यांचे पुत्र, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘एकनाथ शिंदे यांचे काय चुकले?’ असा थेट सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला. या अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडावे ही भूमिका एक नाही, दोन नाही, तब्बल ५० आमदारांनी मांडल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. बंडानंतर प्रथमच ठाण्यातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिंदे यांच्या निवासस्थानी शनिवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेचे काही नेते सरसावले असताना शनिवारी ठाण्यात शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थनासाठी हजारोच्या संख्येने शिवसैनिक एकवटले होते. यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी अडीच वर्षाच्या काळात आघाडीतील घटक पक्षांकडून शिवसेनेला दिल्या गेलेल्या सापत्न वागणुकीचा पाढा वाचला. ‘या आघाडीत अडीच वर्षात शिवसेनेत असंतोष निर्माण झाला असून कार्यकर्त्याचा जीव घुसमटत आहे. आमदार सेनेचे आणि पालकमंत्री राष्ट्रवादीचा दिला. या पालकमंत्र्याच्या माध्यमातून सेनेची कोंडी करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बळ दिले. ग्रामीण भागात तर ऊस खरेदी करताना पक्षाचे नाव विचारून राष्ट्रवादीच्या ऊस कारखानदारांकडून गळचेपी केली गेली.

logo
marathi.freepressjournal.in