
ठाणे : यापूर्वी किरकोळ दुरुस्तीसाठीही कोट्यवधींचा खर्च करण्यात आलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी आता तब्बल २६ कोटींचा खर्च केला जाणार आहे. गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्य शासनाकडून ८ कोटींचा निधी महापालिकेकडे प्राप्त झाला असून आणखी तीन महिने दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू राहणार असल्याने नाट्यकर्मी आणि रसिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
ठाण्याचा मानबिंदू असलेल्या गडकरी रंगायतनच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नाटकांचा आणि कार्यक्रमाचा सर्व भार हा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहावर पडला आहे. ९० दिवसांच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, नाट्यगृहाच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने जवळपास अजून २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाणार आहे. तसेच, काळारूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
करून दिल्या जाणार आहेत. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जात आहे. रंगायतनच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने आठ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
ठाण्यात शिवसेनेची पहिली सत्ता आल्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकर रसिकांना गडकरी नाट्यगृहाची पहिली भेट दिली. सन १९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची १९९८ मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती, त्यानंतर आता २६ वर्षांनी नूतनीकरण होत आहे. नूतनीकरणात प्रामुख्याने प्रवेशद्वाराची आधुनिक रचना, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नूतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण, ड्रेसिंग तसेच व्हीआयपी रूम, अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे आदी कामांचा समावेश आहे.
राज्य शासनामार्फत ८ कोटींचा निधी प्राप्त
गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी देखील कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नाट्यगृहाची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी तब्बल २६ कोटी ९० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी राज्य सरकारकडून आतापर्यंत अवघे ८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी दुसऱ्या टप्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.