प्रदूषणाविरोधात आंदोलन

महापालिकेद्वारे ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला अमृत योजनेंतर्गत मंजुरी मिळाली असून गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे.
प्रदूषणाविरोधात आंदोलन

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात भुयारी गटारीचे पाइप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते अद्याप देखील दुरुस्त केले नसल्याने, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील धर्मवीर आनंद दिघे चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

महापालिकेद्वारे ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला अमृत योजनेंतर्गत मंजुरी मिळाली असून गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. धुळीने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक नागरिकांना श्वासनाचे त्रास सुरू झाले असल्याचा आरोप ॲड. स्वप्नील पाटील यांनी केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनात अनेक जण सहभागी झाले होते. दरम्यान या ठिय्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत यावर तोडगा निघत नाहीं, तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी घेतली.

या प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या उल्हासनगर मनपाच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, कनिष्ट अभियंता परमेश्वर बुडगे, तरुण सेवकानी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली, तसेच या विषयावर पालिका अधिकारी, एमएमआरडीए आणि प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in