शिंदे, फडणवीस सरकारवर आगरी-कुणबी समाजाची नाराजी

समाजाचे स्वर्गीय शांतारामभाऊ घोलप यांना महसुलमंत्रिपद देवून ठाणे जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न केला
शिंदे, फडणवीस सरकारवर आगरी-कुणबी समाजाची नाराजी
Published on

गेल्या पन्नास वर्षात ठाणे जिल्ह्यात मोठया प्रमाणात असणाऱ्या कुणबी-आगरी समाजाला प्रत्येक राजकीय पक्षांनी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख पदापासून खासदार, आमदार, पालकमंत्रिपदाची धुरा देऊन आजपर्यंत राजकारण केले आहे. त्याच समाजाच्या नेत्याचे पंख कापण्याचा प्रयत्न भाजप-शिंदेगट सेनेने केल्याने ठाणे जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

काँग्रेस राजवटीत कुणबी समाजाचे स्वर्गीय शांतारामभाऊ घोलप यांना महसुलमंत्रिपद देवून ठाणे जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न केला. भाजपने जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद देऊन भाजप वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. १९९५ ला राज्यात प्रथम भाजपसेना युतीचे सरकार आल्यावर गणेश नाईक यांना ठाणे जिल्हा पालकमंत्रिपद देऊन शिवसेना खेड्यापाड्यात नेण्याचा प्रयत्न यशस्वी केला. कुणबी - आगरी समाज नेतृत्वाला फडणवीस - शिंदे सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री सोडाच साधे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले नाही. ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी साताऱ्याच्या शंभुराज देसाई यांची नियुक्ती केल्याने राजकीय, सामाजिक चळवळीत एकच खळबळ आहे. ठाणे जिल्ह्याचा आमदार राज्याचा मुख्यमंत्री ठरवू शकतो. अशा शब्दांना कात्री लावून ठाणे जिल्ह्याच्या भुमीपुत्रांना आता सातारचा आधार घ्यावा लागणार अशा प्रकारे संबोधले जात आहे. ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री असताना जिल्ह्याला सातारचा पालकमंत्री कशासाठी ? ठाणे जिल्ह्याचा कार्यभार भाजपचे रविंद्र चव्हाण सुध्दा सांभाळू शकले असते अशा भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गणेश नाईक, मुरबाडचे किसन कथोरे यांना मिळेल अशी अपेक्षा जनमाणसात होती.

logo
marathi.freepressjournal.in