ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडीतील हवेची गुणवत्ता घसरली

दिल्ली आणि मुंबईची हवा अतिशय प्रदूषित झाली असल्याने या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहे
ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडीतील हवेची गुणवत्ता घसरली

ठाणे: नव्या वर्षातही हवेचे प्रदूषण कायम असून ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी या शहरांच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत या शहरांच्या हवेच्या निर्देशांक २०० ते ३०० पर्यंत असल्याचे उघड झाले असून त्यामुळे ठाणेकरांची नव्या वर्षातील सुरुवातही प्रदूषणानेच झाली असल्याचे म्हटले जात आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुन्हा एकदा महापालिका स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. तर प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांचा देखील सहभाग महत्त्वाचा असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिल्ली आणि मुंबईची हवा अतिशय प्रदूषित झाली असल्याने या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेच प्रशासनाला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ठाणे महापालिकेनेने प्रदूषणाबाबत महत्त्वाची नियमावली तयार केली असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासही सुरुवात केली आहे. यामध्ये प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात लाखो रुपयांचा दंड देखील आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. मात्र इतक्या उपाययोजनांवर समाधान न मानता पालिकेच्या वतीने कारवाईचे सत्र राबविले जात आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यापासून हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे दिसून आले होते. आता जानेवारीच्या पहिल्या तीन दिवसातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम धोका आणि वाईट प्रकारातच असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपमधून समोर आले आहे. यात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रस्ते धुवून त्यावरील धूळ कमी करणे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विशिष्ट नियमावलीची अंमलबजावणी करण्याची सक्ती करणे, कचरा, धूळ कमी करण्यासाठी उपाययोजना करणे अशा गोष्टी करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरून सखोल स्वच्छता मोहीम राबवत आहेत. तशाच सूचना ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या पालिकांना देण्यात आल्या आहेत. कुळगाव- बदलापूर आणि अंबरनाथ यासारख्या नगरपालिकांनाही अशाच सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांचे पालन होत असेल तरी त्यामुळे हवेचा निर्देशांक जिल्ह्यात सुधारत असल्याचे दिसून येत नाही.

तीन दिवसांतच प्रदूषण वाढले

बदलापुरात या तीन दिवसांत सरासरी हवेची गुणवत्ता निर्देशांक २०० म्हणजे वाईट दर्जाची होती, तर उल्हासनगर शहरात सरासरी निर्देशांक २३० इतका होता. भिवंडीत हाच निर्देशांक सरासरी २२० इतका होता. तर ठाणे शहरात कासारवडवली येथील हवा तपासणी केंद्रात सरासरी १६० तर उपवन येथील केंद्रात सरासरी २६० निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हवा तपासणी केंद्र आहेत, त्या त्या ठिकाणी हवेची गुणवत्ता निर्देशांक घसरल्याचेच दिसून आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in