बदलापुरात अजित पवार गटाची शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू; महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे बदलापूर दौऱ्यासाठी मुंबई ते बदलापूर असा लोकल प्रवास करणार आहेत
बदलापुरात अजित पवार गटाची शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू; महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

बदलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट व शरद पवार गट वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच बदलापुरात अजित पवार गटाचा मेळावा होत आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या मेळाव्याची सुरू असलेली जय्यत तयारी पाहता या मेळाव्याच्या निमित्ताने बदलापुरात अजित पवार गट जोरदार शक्ती प्रदर्शन करीत असल्याचे दिसत आहे.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रियांका दामले यांनी शनिवारी (दि.१३) बदलापूर पूर्वेकडील गुप्ते म्हसकर हॉलमध्ये सकाळी ११ वा. महिला व युवती मेळाव्याचे आयोजन केले आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीत बंड करून भाजपसोबत राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानतर राष्ट्रवादीचे शरद पवार गट व अजित पवार अशा दोन गटात विभाजन झाले. विभाजन झाल्यानंतर शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाची तर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाची वाटचाल सुरू आहे.

विभाजनानंतर अजित पवार गटाचा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेला हा पहिला मेळावा यशस्वी करण्यासाठी कॅप्टन आशिष दामले यांनी कंबर कसली आहे.

शहराच्या भागाभागातील महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. रस्तोरस्ती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत.

आदिती तटकरे यांचा लोकल प्रवास

महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे बदलापूर दौऱ्यासाठी मुंबई ते बदलापूर असा लोकल प्रवास करणार आहेत. बदलापुरात महिला व युवती मेळाव्यानंतर बदलापूर पश्चिमेकडील बेलवली येथील राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात त्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे सामूहिक किचन, दादाज पथलॉजी, दादास जिम तसेच अजित पवारांना समर्पित ग्रंथालयासही भेट देणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in