
ठाणे : अक्षय्य तृतीयेचा योग साधत लग्न करणे, शुभ मानण्यात येते. या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात, त्यात लग्नाचा देखील समावेश आहे. त्यानुसार यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ठाणे दुय्यम निबंधक कार्यालयात ३२ जोडप्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची लग्नगाठ बांधली आहे.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त असून या मुहूर्तावर नागरिक मोठ्या प्रमाणावर नवीन वस्तू व वास्तू खरेदी करण्याकडे कल असतो. तर, महिला वर्ग या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करीत असतात. यामध्ये काही नागरिक सोने हे गुंतवणुकीसाठी तर, काही गरज म्हणून खरेदी करत असतात. त्यात लग्नसराईचे मुहूर्त असल्याने सोने खरेदीसाठी देखील झुंबड उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
ठाणे जिल्हा निबंधक कार्यालयात या मुहूर्तावर दुपारपर्यंत ३२ जोडप्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची लग्नगाठ बांधली आहे. तसेच संध्याकाळपर्यंत यात वाढ होऊन ५० इतके विवाह होतील, असा विश्वास निबंधक कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला होता.
वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे बुधवारी ज्वेलर्स दुकानांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. आज सोन्याचा भाव ९८००० वर होता, तरीही डोंबिवलीत सोने खरेदी करण्याकरिता ज्वेलर्स दुकानात गर्दी झाली होती. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील वामन हरी पेठे सन्समध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. अमित काळे म्हणाले, सोने कितीही महागले तरी सोन्याबरोबर ज्वेलरी, नाणे खरेदी करण्यावर नागरिकांचा अधिक जोर असतो.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने आणि नाणी खरेदीवर भर होता. सोन्याचा भाव किती ही असला तरी आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यावर महिलांचा अधिक जोर असतो. त्यामुळे डोंबिवलीतील अनेक ज्वेलर्स दुकानात सायंकाळी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.
- शैलेश दाबके, ज्वेलर्स