
अलिबाग : अलिबाग बंदरावर दुसऱ्या गावातील मच्छिमार आपली मच्छी उतरवित असल्याने अलिबाग बंदरावरील मच्छिमारांना मच्छी उतरविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेर गावच्या नौकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छिमार बांधवांनी केली आहे.
अलिबाग बंदरावर साखर गावाच्या मासेमारी नौका मासे उतरवण्यासाठी व मासळी विक्रीसाठी येत असतात. अलिबाग येथील मच्छिमार संस्थेच्या एकूण ३०० ते ३५० नौका असून त्या नौका अलिबाग बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी रोज येत असतात. अलिबाग जेट्टी ही ३०० ते ३५० नौकांच्या मासळी उतरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे. साखर या गावाच्या २० ते २५ नौका मासे उतरवण्यासाठी येतात, तसेच अलिबाग संस्थेच्या नौकांना मासे उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही.
लिबागचे नौकाधारक व बाहेरच्या नौका धारकांमध्ये मासळी उतरवण्यावरून मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असतात. अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरील नौकांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक बंदर असूनही अलिबाग बंदराचा वापर
साखर गावामध्ये मासळी उतरवण्यासाठी साखर आक्षी हे बंदर असून ते त्या बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी तेथे नौका लावण्यात याव्यात. साखर गावामध्ये बंदर असूनसुद्धा ते अलिबाग बंदरावर मासळी उतरवण्यासाठी व विक्रीसाठी नौका घेऊन येतात, त्यामुळे नेहमी वाद विवाद होत असतात. त्यांना नेहमी वारंवार सांगून सुद्धा जाणूनबुजून अलिबाग बंदरावर बोटी लावल्या जातात.