
दिव्यात बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांना आयुक्तांच्या दौऱ्याची टीप देण्याचा आराेप झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांची दिवा प्रभाग समितीतून अखेर उचलबांगडी करण्यात आली. या ‘टीप’ प्रकरण संदर्भातील ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून कारवाईसाठी अनेकांनी रान उठवले होते. त्यांनंतर सक्तीच्या रजेवर गेलेल्या खैरे गुरुवारी पुन्हा हजर झाल्या. मात्र त्यांच्याकडील दिव्याचा सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंब्रा प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांच्याकडे देण्यात आला होता. आता त्यांची गच्छंती करून त्यांच्याकडे जाहिरात, निवडणूक आणि जनगणना विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, त्या ऑडिओ क्लिपची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. सध्या प्रशासकीय राजवट असली तरी मागील काही महिन्यांपासून भूमाफियांनी हैदोस घातला आहे. शासकीय भूखंड, मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत. या संदर्भात भाजपने देखील वारंवार आवाज उठवला आहे. दिवा भागातही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. अशाच काही हितसंबंध्यांची बांधकामे वाचविण्यासाठी अतिक्रमण पथकाच्या कारवाईची आगाऊ खबर दिली जात असल्याचा आराेप वारंवार हाेत आला आहे.