सर्व काही क्रीम पोस्टींगसाठी...

स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या ठाण्यात अवघी १८ टक्के बांधकामे अधिकृत असल्याची माहिती काही वर्षांपूर्वीच उघडकीस आली
सर्व काही क्रीम पोस्टींगसाठी...

ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ मार्च महिन्याच्या सुरवातीला संपुष्टात आला असून पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. दरम्यान कोरोना काळात शहरात लाखो बेकायदा बांधकामे झाल्याचे उघड झाले असताना प्रशासकीय राजवट लागताच शहरात बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. त्यातही कळवा-मुंब्रा परिसरात बेकायदा बांधकामांनी कळस गाठला आहे. पालिका अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्यानेच हा काळा धंदा बळावला असल्याची चर्चा सुरु असताना ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यांनी नव्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ सुरु केली असल्याने या आरोपांना पुष्टी मिळू लागली आहे. विशेष म्हणजे दिलेल्या वेळेत नव्या ठिकाणचा कार्यभार न स्वीकारल्याने काही बड्या अधिकार्यांना करणे दाखवा नोटीस बजावण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.

स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या ठाण्यात अवघी १८ टक्के बांधकामे अधिकृत असल्याची माहिती काही वर्षांपूर्वीच उघडकीस आली आहे. अवघ्या सहा वर्षापूर्वी ठाणे शहरातील ३५ टक्के बांधकामे अधिकृत होती तर ६५ टक्के बांधकामे अनधिकृत असल्याचे सांगण्यात येत होते मात्र त्यानंतर दोनच वर्षात ८२ टक्के बांधकामे बेकायदा असल्याचे उघड झाले. तर २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षाच्या कोरोनाकाळातही ठाणे शहरातील नागरिकरण झपाट्याने वाढत असल्याचे उघड झाले असून या दरम्यान नव्याने जवळपास ६२ हजार मालमत्ताची देयके वाढल्याचे अधिकृत आकडेवारी सांगते,ही देयके असल्याने किती बांधकामे वाढली हे निश्चित सांगता येत नसले तरी दोन वर्षात मोठ्या प्रमाणात लाखोंच्या मालमत्ता वाढल्या असून त्यातही बेकायदा मालमत्तांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

कळवा - खारेगाव - मुंब्रा - दिवा बेकायदा बांधकामाचे आगार

जुन्या कळवा परिसराचा ठाणे महापलिकेत समावेश झाल्यानंतर ग्रामीण पेहरावाला शहरी साज देण्याचा प्रयत्न सुरू झाला मुळातच ग्रामपंचायतीच्या काळात इमारत बांधकामांना परवाणगी देताना योग्य नियोजन न केल्यामुळे कळवा गाव अस्ताव्यस्त वाढले विशेष म्हणजे तेंव्हापासूनच या गावाला बेकायदा बांधकामांचा शाप लागला आहे. आता पूर्वीचे कळवा गाव ठाणे महपालिका क्षेत्रात चांगलेच विस्तारत चालले असून गावठाणात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती बांधल्या जात आहेत. तर कळवा, विटावा, खारेगाव आणि पारसिकनगर या पश्चिमेकडील भागासह कळवा पूर्वेला न्यू शिवाजी नगर,आनंद नगर, गणपत पाडा, मफतलाल झोपडपट्टी आतकोणेश्वर नगर,पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबा नगर या सर्वच परिसरात बेकायदा झोपडपट्‌ट्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. महत्वाचे म्हणजे पारसिक डोंगर अशा बेकायदा झोपड्यांनी पूर्णपणे वेढला असून या परिसरात जागा बळकावून झोपड्या बांधने आणि त्या विकणे खुलेआम सुरु आहे.

दुसरीकडे खारेगाव आणि पारसिक नगर परिसरात गेल्या काही वर्षात टोलेजंग टॉवर उभे रहात आहेत. मोकळी हवा आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे फक्त मुबई आणि ठाण्यातीलच नव्हे तर लगतच्या कळवा परिसरतील नागरिकांनी घर विकून याठिकाणी घर विकत घ्यायला सुरवात केली त्यामुळे बडे बिल्डर्स नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि भूमाफियांनी नजरदेखील या परिसरावर पडली.

चार मजली जुन्या इमारतीवर उघडपणे नवे मजले उभारण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे या जुन्या अनधिकृत इमारतीवर काही वर्षांपूर्वी पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाई देखील केली होती. गेल्या वर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाल्याने तत्कालीन उपायुक्त्यांची बदली करण्यात आली होती मात्र प्रशासकीय राजवट सुरु असताना पुन्हा बेकायदा बांधकामांनी जोर पकडला आहे.

कळवा पूर्वेला मिनी धारावी

कळवा पूर्वेला जी आता मिनी धारावी उभी राहिली असल्याचे चित्र आहे. स्थानिक नेते मंडळींचा आर्शिवाद, झोपडपट्टी दादांची दशहत आणि हतबल यंत्रणा यामुळे खुलेआम बेकायदा झोपड्या उभारणे आणि त्या काही हजारात विकण्याचे काम सुरू होते. आपण सीआर झेडचे उल्लंघन करून जागा विकत घेत आहोत सरकारची फसवणूक करत आहोत असा कोणताही विचार न करता हजारो जणांनी या ठिकाणी झोपड्या विकत घेतल्या सरकारी नियमांनूसार या झोपड्यांना लाईट,पाणी यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अजूनही हा व्यवसाय सुरू आहे हा काळा धंदा सर्वांच्या समोर सुरु आहे परंतू सरकारी आणि महापालिका यंत्रणा मूग गिळून गप्प आहेत.

यंत्रणा इथे विकली जाते

मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे होत असल्याने यात काळ्या पैशाचे मोठे अर्थकारण होत असते विशेष म्हणजे हेच लोणी मिळवण्यासाठी कमला मुंब्रा दिवा परिसरातील पोस्टिंग मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांची चढाओढ लागल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात पालिकेच्या बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या मात्र त्यातील दोन सहायक आयुक्तांनी नव्या ठिकाणी पदभार स्वीकारण्यास टाळाटाळ केली आणि या विषयाची चर्चा पुन्हा पालिका वर्तुळात सुरू झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in