­­‘ऑल आऊट ५०००’ फटाक्याचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद, फटाक्यांची चाचणी, ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
­­‘ऑल आऊट ५०००’ फटाक्याचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद, फटाक्यांची चाचणी, ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी
­­‘ऑल आऊट ५०००’ फटाक्याचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद, फटाक्यांची चाचणी, ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

ठाणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या १९ प्रकारच्या फटाक्यांची प्रत्यक्ष चाचणी घेतली. या चाचणीत ‘ऑल आउट ५०००’ या फटाक्याचा आवाज सर्वाधिक १११.८ डेसिबल नोंदविण्यात आला, तर ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी ७४.४ डेसिबल आढळला. वागळे इस्टेट येथील एका कंपनीच्या मोकळ्या जागेत गुरुवारी ही चाचणी घेण्यात आली.

उच्च न्यायालयाने ध्वनी आणि वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या फटाक्यांवर निर्बंध घातले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासही मनाई केली आहे. या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बाजारातून विविध प्रकारचे फटाके खरेदी करून त्यांच्या आवाजाची तीव्रता मोजली. गेल्या वर्षी २५ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली होती. यंदा १९ प्रकारच्या फटाक्यांची तपासणी करण्यात आली.

या चाचणीत ‘ऑल आउट ५०००’चा आवाज १११.८ डेसिबल नोंदविण्यात आला. त्याखालोखाल ‘टू गोल्ड’ या फटाक्याचा आवाज १०७.३ डेसिबल, ‘आर.के.’चा ९९.९, ‘मॅक्स’चा ९४.३, ‘सुदाम’चा ९१.४ आणि ‘कमांडो’चा ९०.६ डेसिबल आढळला. ‘वेलकानो’चा आवाज ८७.७, ‘टर्की’ आणि ‘गॉडझिला’चा प्रत्येकी ८५.४, तर ‘नाचीर’चा ८५.१ डेसिबल नोंदविण्यात आला.

याशिवाय ‘लेझर कलर’चा आवाज ८३.७, ‘गॉड ऑफ थंडर’चा ७९ आणि ‘कलर बटरफ्लाय’चा ७६.३ डेसिबल होता. ‘कुरवी चिमणी’चा आवाज ७४.४ डेसिबल नोंदविण्यात आला. तर ‘रेल्वे सिग्नल लाईट’चा आवाज ६७.६ डेसिबल असल्याचे चाचणीदरम्यान आढळले.

या चाचणीवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले आणि संजीव रेदासानी, ठाणे महापालिकेचे उपपर्यावरण अधिकारी ओम परळकर, वागळे इस्टेट पोलीस कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्यासाठी प्रमाणित हरित फटाके आणि कमी आवाजाचे फटाके वापरावेत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई असल्याने नियमांचे उल्लंघन करू नये.

संजीव रेदासानी, अधिकारी उपप्रादेशिक

हरित फटाके वापरण्याचे आवाहन

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात येत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या फटाक्यांचे नमुने घेऊन मोकळ्या जागेत त्यांची चाचणी करण्यात आली. डेसिबल मापक यंत्राच्या साहाय्याने त्यांच्या आवाजाची तीव्रता नोंदविण्यात आली, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)