आ. किणीकरांच्या हत्येचा डाव फसला; दोन आरोपींना अटक, दोन फरार

लातूर येथे लग्न समारंभाच्या ठिकाणी हत्या करण्याचा भयंकर डाव आखणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोघे अजून फरार आहेत.
बालाजी किणीकर
बालाजी किणीकर
Published on

उल्हासनगर : राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि चौथ्यांदा आमदार बनलेले डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट ठाणे गुन्हे शाखेने उधळून लावल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. लातूर येथे लग्न समारंभाच्या ठिकाणी हत्या करण्याचा भयंकर डाव आखणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोघे अजून फरार आहेत. या घटनेमुळे अंबरनाथ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून किणीकर समर्थकांनी अंबरनाथ बंदची हाक दिली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथ शहरातील खुंटवली गाव आणि स्वामीनगर भागांमध्ये कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. या घटनेने अंबरनाथमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत, तर या कटातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर सध्या लातूर येथे आपल्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी रवाना झाले आहेत. हत्यारे लग्नाच्या गडबडीत किणीकर यांची हत्या करून पसार होण्याचा कट रचत होते. मात्र, पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे या कटाचा भंडाफोड झाला. या घटनेनंतर किणीकर समर्थकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

शहरात बंद पुकारण्याची तयारी सुरू असून, समर्थकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून आमदार बालाजी किणीकर यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत आणखी सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.

ठाणे गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. हत्येचा कट रचणाऱ्यांचा नेमका उद्देश, आणि त्यामागील सूत्रधार कोण? याचा शोध घेतला जात आहे. फरार आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणाचे पूर्ण सत्य उघड होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बालाजी किणीकर हे सध्या लग्नसोहळ्यासाठी लातूरला आहेत.

अंबरनाथचा रक्तरंजित इतिहास

अंबरनाथ शहराचा राजकीय इतिहास हा अनेक राजकीय हत्यांनी बरबटलेला आहे. नरेश गायकवाड, वसंत पांढरे, नितीन वारिंगे, प्रसन्न कुलकर्णी, देवराम वाळूज, किशोर सुळे, रमेश गोसावी आणि अशोक गायकवाड या नेत्यांच्या हत्या अंबरनाथच्या इतिहासात कायम स्मरणात राहतील. किणीकर यांच्या हत्येचा कट हा या रक्तरंजित इतिहासाचा आणखी एक धक्कादायक भाग ठरला असता.

logo
marathi.freepressjournal.in