कर्जतच्या हापूसला बदलापूरकरांची पसंती; एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच बाजारात दाखल

बदलापूरकर या आंब्याला पसंती देत असून त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगारासाठी कर्जतचा हापूस आंबाही मोठा आधार ठरू लागला आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)

बदलापूर: यंदा आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात आले असले तरी सर्वांचा आवडता हापूस आंबा मात्र अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे कर्जतचा हापूस आंबाही एक नवा पर्याय म्हणून समोर आला आहे. बदलापूरकर या आंब्याला पसंती देत असून त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगारासाठी कर्जतचा हापूस आंबाही मोठा आधार ठरू लागला आहे.

यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच बाजारात हापूस दाखल झाले आहे. मात्र देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील असे नाहीत. त्यामुळे अशा ग्राहकांना बदाम, केसर, तोतापुरी व इतर जातीच्या आंब्यांवर समाधान मानावे लागत आहे. आंध्र, कर्नाटक अशा इतर राज्यातूनही हापूससारखे आंबे येत असले तरी त्यांना कोकणातील आंब्याची मजा नाही. त्यामुळे ग्राहक त्यांना पसंती देत नाहीत. याऊलट गेल्या काही वर्षापासून बदलापूरच्या बाजारपेठांमध्ये कर्जतच्या हापूस आंब्याची चलती पाहायला मिळत आहे. हापूस आंब्यासारखा रंग, तसाच गोडवा आणि विशेष म्हणजे रसायनांचा वापर न करता नैसर्गिकपणे पिकविलेला हा आंबा परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे.

कर्जत परिसरातील आदिवासी बांधव वर्षभर मोलमजुरी करतात. थोड्याफार जमिनीवर भाताची व दैनंदीन गरजेच्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. त्याशिवाय पावसाळ्यात रानभाज्या आणि उन्हाळ्यात जांभूळ, करवंद अशा रानमेव्याची विक्री करून आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह सुरू असतो.

३०० रुपये डझनापासून सुरुवात

सणावाराला लागणाऱ्या विविध वनस्पतींची, पाने - फुले व फळांच्या विक्रीतूनही हंगामी रोजगार उपलब्ध होत असतो. त्यात गेल्या काही वर्षांपासून कर्जतच्या हापूसचाही समावेश झाला आहे. कर्जत, पळसदरी व इतर भागातून दररोज अनेक आदिवासी महिला कर्जत हापूस आंबा घेऊन विक्रीसाठी बदलापुरात येत असतात. त्यांच्याकडे सुमारे तीनशे रुपये डझन अशा भावात हा हापूस आंबा उपलब्ध असून एकेक महिला सुमारे १५ ते २० डझन आंब्याची विक्री करत असते. त्यातून या महिलांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

"कर्जतच्या हापूसची चव व रंग जवळपास रत्नागिरी हापूस आंब्यासारखीच आहे. त्याशिवाय स्थानिक आदिवासींकडून ते खरेदी केल्याने त्यांच्या रोजगारासाठी खारीचा वाटा उचलण्याचे समाधानही मिळत असल्याने आम्ही तो आवर्जून खरेदी करतो." -गीता सोहनी, (ग्राहक, बदलापूर)

logo
marathi.freepressjournal.in