
ठाणे : वाढते ठाणे शहर, घोडबंदर रोड व लगतच्या भागातील नियमितची वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज असून घोडबंदर ते ठाणे असा खाडीकिनारी ठाणे फ्री-वे बांधून तो पुढे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाला जोडावा, अशी आग्रही मागणी ठाणे भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
याबाबतचे लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली. ठाणे, घोडबंदर या भागातील वाढते नागरिकीकरण, वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन ठाणे शहरातील रस्त्यांची वाहने सामावून घेण्याची क्षमता आज घडीला संपलेली आहे. आत्ताच यावर विशेष उपाययोजना न केल्यास भविष्यात सर्वाधिक वाहतूककोंडीचे शहर अशी ठाणे शहराची ओळख होईल.
हे टाळण्यासाठी ठाणे शहराच्या खाडीकिनाऱ्यालगत स्वतंत्र ठाणे फ्री-वे उभारण्याची गरज असून यासंदर्भात राज्य, सरकार केंद्र सरकार, महापालिका आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे उपक्रम राबवावा अशी मागणी कृष्णा पाटील यांनी या पत्रात केली आहे. हा ठाणे फ्री-वे खालील मार्गाने उभारल्यास त्याचा फायदा ठाणे शहराबरोबर नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदर, विरार या दिशेने जाणाऱ्या वाहनांना देखील होईल.
केवळ मेट्रो उभारणीतून या भागातील वाहतूककोंडी सुटणार नाही. वाढते शहरीकरण आणि नागरिकांच्या वाहनांची वाढती संख्या,रस्ता रुंदीकरणाला असलेल्या मर्यादा, या गोष्टी लक्षात घेऊन अवजड वाहनांची वाहतूक ही नवी मुंबई ते थेट घोडबंदरच्या दिशेने बाहेरच्या बाहेर झाल्यास संपूर्ण शहराचा वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल.
असा असावा ठाणे फ्री-वे चा मार्ग
फाऊंटन खाडी, गायमुख खाडी, कासारवडवली खाडी, हिरानंदानी वाघबीळ खाडी, साकेत खाडी, कोलशेत खाडी ते कळवा खाडी-ठाणे स्टेशन ते नवी मुंबई असा मार्ग खाडीकिनाऱ्याने निर्माण केल्यास ठाणे फ्री-वे ची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. यासाठी सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे, असे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.
- कृष्णा पाटील, माजी नगरसेवक भारतीय जनता पक्ष, ठाणे
ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आपण आपल्या स्तरावर सहकार्य करावे. कृपया आपण या दृष्टीने गांभीर्याने विचार करावा. वाहतूककोंडीने ठाणेकर जनतेसह नवी मुंबई आणि वसई-विरार, घोडबंदर या भागात जाणारे नागरिक हैराण आहेत. यावर कायमचा तोडगा काढणे आता गरजेचे आहे. भविष्याचे नियोजन म्हणून ठाणे फ्री-वे हा यावर महत्त्वाचा उपाय ठरेल!