नितीन बोंबाडे/ पालघर
पालघर लोकसभेसाठी अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवार निश्चित केले नसले तरी राजेंद्र गावित यांना विरोध करण्यासाठी पुन्हा एकदा नाराजी प्रदर्शनाचे सत्र सुरू झालेले पाहायला मिळत आहे. खासदार राजेंद्र गाविताना दोन वेळा विधानसभा पुन्हा लोकसभा निवडणुकात उमेदवारी मिळू नये यासाठी चार ते पाच वेळा विरोध केला, तरीही ते सातत्याने निवडून आलेत. पालघर लोकसभेसाठी दोन वेळा सातत्याने निवडून आल्यानंतर धोबी पछाड झालेल्या पक्षाकडून गावितांच्या विरोधासाठी पुन्हा वेगवेगळ्या संघटनाना सक्रिय करून एक मोहीम चालवली जात आहे.
जिकडे जाईल तिकडे संघटना त्याची हुर्यो करत आहेत. वेगवेगळ्या संघटना गावित यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी पत्र देऊन तसा विरोधी प्रचार करून तर शिवसेना शिंदे गट नेते पत्रकार परिषदा घेऊन, पत्रकारांना बाइट देऊन गावितांना प्रकाशझोतात ठेवत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात एखाद्या नेत्यांची लोकांमध्ये सातत्याने चर्चा होत असेल तर त्या नेत्याला आणखी काय हवे? असेही मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
पालघरमध्ये लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या. पक्ष बदलूनही ते निवडून आले. गाविताना पाडण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलूनदेखील पालघरची जागा दुसऱ्या राजकीय पक्षांना जिंकता आली नाही.
राजेंद्र गावित हे आपल्या विरोधातील प्रत्येक टीकेचा, कृतीचा फायद्यासाठी उपयोग करून घेतात. लोकांच्या मनात आहोत या भूमिकेतूनच त्यांनी संवाद साधणे सुरू केले आहे. निर्णय प्रक्रियेत असलेल्या नेत्यांशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सगळी ऊर्जा गावितांच्या विरोध करण्याकडे वळवली आहे. या नेत्यांच्या बोलण्यामध्ये कदाचित नवा मुद्दा नसला तरी गावितांची लोकप्रियता वाढविण्याचे ‘कंत्राट’ संघटनांना मिळाले असावे,असे म्हणावे इतकी परिस्थिती पालघरच्याच नेत्यांनी निर्माण केलेली आहे.