

अंबरनाथ: अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपशी आघाडी केल्याने काँग्रेसने या सर्व नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र काँग्रेसच्या या १२ नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप आघाडी पालिकेतील सत्तेची मॅजिक फिगर गाठण्यात यशस्वी झाली आहे. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारत शिवसेनेचा गड सर केला. मात्र राज्यात युतीत असलेली शिवसेना, भाजप निवडणुकीनंतर नगरपालिकेत सत्तेत एकत्र येण्याची शक्यता असतानाच, भाजपने चक्क काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करत शिवसेनेला धक्का दिला. त्यानंतर शिवसेनेने या युतीला ‘अभद्र युती’ संबोधून जाहिर नाराजी व्यक्त केली.
या युतीबाबत मुख्यमंत्र्यांची अडचण झाल्याने त्यांनी ती रद्द करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे काँग्रेस वरिष्ठांनीही थेट अंबरनाथमधील काँग्रेस सर्व नगरसेवकांसह कार्यकारिणी निलंबित केली. मात्र काँग्रेस नगरसेवकांवरील संकटातील संधीचा भाजपने लाभ घेतला. त्यानुसार सर्व काँग्रेस नगरसेवकांचा गुरूवारी रात्री उशिरा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
काँग्रेसच्या १२ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ १५ वरून २७ वर पोहचले आहे. राष्ट्रवादी भाजपची आघाडी असल्याने राष्ट्रवादीचे ४ मिळून एकूण ३१ नगरसेवकांचे संख्याबळ आता भाजपच्या हाती आले आहे. यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला आपला झेंडा रोवण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, आठवडाभर सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर व संघर्षानंतरही शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात भाजपला यश आले आहे. मात्र त्यामुळे १२ तारखेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपूर्वी शिवसेना, भाजप युती होते की शिवसेना विरोधी बाकावर बसते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.