

अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील श्री गणेश केमिकल कंपनीत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, ही आग कशाने लागली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंबरनाथ येथील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री गणेश प्रोसेस इक्विपमेंट्स प्रा. लि. या रासायनिक कंपनीमध्ये विविध औद्योगिक प्रक्रिया उपकरणांचे उत्पादन केले जाते. सोमवारी संध्याकाळी अचानक झालेल्या स्फोटानंतर काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, आजूबाजूच्या काही कंपन्यांनाही त्याचा फटका बसला. आग आटोक्यात आणण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि कल्याण येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.