

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेत एकापाठोपाठ एक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र भाजपशी आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी आता शिवसेनेला पाठिंबा देत उपनगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. भाजपसाठी हा जोरदार धक्का असल्याचे मानले जाते. त्यामुळे १२ जानेवारीला होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेपूर्वी भाजप कोणती खेळी खेळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची यंदाची निवडणूक सातत्याने चर्चेत राहिली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपद भाजपने मिळवले. त्यानंतर शिवसेनेकडे असलेले सर्वाधिक संख्याबळ पाहता अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना-भाजपा युती होईल, असे राजकीय वर्तुळात वाटत होते. मध्यंतरी यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आल्याचेही दिसत होते. मात्र नंतर अचानक भाजपाने महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला बाजूला सारून काँग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. देशातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपने काँग्रेसशी युती केल्याने राज्यात खळबळ उडाली. या युतीबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली. त्यामुळे त्यांनी या युतीबाबत नाराजी व्यक्त करत काँग्रेस सोबतची युती रद्द करण्याचे आदेश दिले.
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अंबरनाथमधील काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांसह कार्यकारिणी निलंबित केली. मात्र काँग्रेस नगरसेवकांवरील संकटातून निर्माण झालेल्या संधीचा फायदा भाजपने उचलण्याचे ठरवले. त्यानुसार अंबरनाथ नगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. काँग्रेसच्या १२ नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ १५ वरून २७ वर पोहचले आणि राष्ट्रवादी, भाजपची आघाडी असल्याने राष्ट्रवादीचे ४ मिळून एकूण ३१ नगरसेवकांचे संख्याबळ भाजपाच्या हाती आले. त्यामुळे शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची भाजपची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात होते. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी ‘मास्टरस्ट्रोक’ मारत अंबरनाथ राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांच्या गटाला गळाला लावले. त्यामुळे संख्याबळाच्या खेळात शिवसेनेचे २८ आणि राष्ट्रवादी ४ असे ३२ नगरसेवकांचे बहुमताचे बळ शिवसेनेच्या हातात आले आहे. तर भाजपाचे संख्याबळ ४ ने घटले आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी
नगरपालिकेत वाढीव स्वीकृत नगरसेवक, उपनगराध्यक्षपद आणि सहा समित्यांसह सत्तेतील महत्त्वाचा वाटा शिवसेनेकडे आला आहे. त्यामुळे भाजप आणि निलंबनानंतर काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १२ नगरसेवकांनाही धक्का बसला आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले असल्याचेही बोलले जात आहे.