
अंबरनाथ : अंबरनाथकरांच्या वर्षानुवर्षांच्या स्वप्नाला अखेर पंख लागले आहेत. रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथच्या सर्कस मैदान परिसरातील नवीन नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे.
अंबरनाथकरांनी नेहमीच शहरात नाट्यगृह हवे असल्याची मागणी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे हे आधुनिक पद्धतीचे नाट्यगृह साकारले गेले आहे. नाट्यगृह फक्त इमारत नाही, तर अंबरनाथ शहराच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरणार आहे.
नाट्यगृहात आकर्षक आणि प्रशस्त रंगमंच, अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, ६५८ प्रेक्षकांची आसनव्यवस्था आहे. याशिवाय दोन छोटे सभागृह, प्रदर्शन कक्ष, कार्यशाळा सभागृह, ग्रीन रूम, क्राय रूम, उपहारगृह आणि भव्य पार्किंग सुविधा असून हे बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र ठरणार आहे. अंबरनाथ, कल्याण व डोंबिवली परिसरातील नागरिकांना आता शहराबाहेर न जाता नाटकांचा अनुभव घेता येणार आहे.
सांस्कृतिक रसिकांचा उत्साह वाढवण्यासाठी लोकार्पण सोहळ्यासह आठ दिवसांचा सांस्कृतिक उत्सवही आयोजित करण्यात आला आहे. लोकार्पणाच्या दिवशी, १९ ऑक्टोबर रोजी भरत जाधव यांचे लोकप्रिय नाटक “सही रे सही” सादर होईल. अंबरनाथचे हे नाट्यगृह शहराच्या सांस्कृतिक जीवनात नक्कीच नवा अध्याय सुरू करणार आहे.
दररोज नाटकांची रेलचेल
२० ऑक्टोबर: करून गेलो गाव
२१ ऑक्टोबर: आज्जीबाई जोरात
२२ ऑक्टोबर: सखाराम बाईंडर
२३ ऑक्टोबर: संगीत देवबाभळी
२४ ऑक्टोबर: मी वर्सेस मी
२५ ऑक्टोबर: पुरुष
२६ ऑक्टोबर: शिवबा
प्रत्येक नाटक दुपारी ४.३० वाजता सादर केले जाईल, ज्यामुळे रसिकांना नाट्यकलेच्या विविध छटांचा आस्वाद घेता येईल.
प्रमुख उपस्थिती
लोकार्पण सोहळ्यासाठी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, महेश मांजरेकर, संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते विजय गोखले, मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, अभिनेत्री अलका कुबल यांचा समावेश आहे. याशिवाय लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर यांचाही सहभाग सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.