अंबरनाथ : अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर वास्तूचे आता शास्त्रोक्त पद्धतीने जतन केले जाणार आहे. या मंदिरावरील काही शिल्प निखळून पडल्याचे समोर आल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पथकाने या मंदिराची पाहणी केली आहे. या वास्तूचे जतन करण्यासाठी लवकरच आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अंबरनाथ पूर्वेतील वालधुनी नदीकिनारी वसलेले शिलाहार काळातील शिवमंदिर उत्कृष्ट स्थापत्य कलेसाठी परिचित आहे. या मंदिरात असलेल्या शिलालेखानुसार या मंदिराचा जीर्णोद्धार इसवीसन १०६० मध्ये राजा माम्वाणी या शिलाहार राजाने केले. अनेक इतिहास, मूर्ती आणि स्थापत्य कलेचा अभ्यास करणारे अभ्यासक या मंदिराला भेट देत असतात. त्याचवेळी धार्मिकदृष्ट्याही या मंदिराचे महत्त्व आहे. त्यामुळे दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत या मंदिराच्या शिल्पाची झीज झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच एका पाहणीत मंदिराच्या अभ्यासक डॉ. कुमुद कानिटकर यांनी येथील मंदिरावरील शिल्पापैकी एक शिल्प निखळल्याचे समोर आले होते. डॉ. कुमुद कानिटकर यांनी समाजमाध्यमावरून याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुरातत्त्व खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी केली. या पाहणीनंतर या मंदिराच्या जतनीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. मंदिरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासह इतर महत्त्वाची डागडुजी केली जाणार आहे. या मंदिराची डागडुजी येत्या आर्थिक वर्षात केली जाणार असल्याची माहिती पुरातत्त्व अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली आहे. त्याचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.
१४० कोटी रुपये मंजूर
शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे शिवमंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
प्राचीन स्थापत्य कलेचा हा वारसा टिकवणे आवश्यक असून ती सर्वांचीच जबाबदारी आहे. मनात केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते, मग त्यासाठी घंटानाद आणि ध्वनिक्षेपकाची काय गरज आहे. याबाबत सर्वांनीच विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
- डॉ. कुमुद कानिटकर, प्राच्यविद्या संशोधक