आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याचे आवाहन

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अगोदर प्रवेश दिलेले आहेत असे सांगून काही प्राचार्य किंवा मुख्याध्यापक प्रवेश नाकारत आहेत
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याचे आवाहन

पालघर जिल्ह्यातील कोणताही आदिवासी विद्यार्थी केवळ प्रवेश मिळाला नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये याबाबत जिल्ह्यातील संस्था,शाळा व महाविद्यालयांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय स्थरावरच आवश्यक ते दाखले मिळवून देण्यासाठी शाळा प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची मागणीही निकम यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पूर्व प्राथमिक पासून शैक्षणिक वर्ग असून खेड्यापाड्यातील दुर्बल घटकातील आदिवासी विद्यार्थी त्यापुढील शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, रयत शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल यांच्या शाळा येथे व ऐपतीनुसार प्रवेश घेण्यासाठी शहराकडे धाव घेतात. परंतु प्रवेशाची मर्यादा संपल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारले जातात.

तर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अगोदर प्रवेश दिलेले आहेत असे सांगून काही प्राचार्य किंवा मुख्याध्यापक प्रवेश नाकारत आहेत. अशा वेळी विद्यार्थी प्रवेश मिळावा म्हणून आटापिटा करतात किंवा वेळप्रसंगी लोकप्रतिनिधीचे दार ठोठावतात यात विद्यार्थ्यांना व पर्यायाने पालकांना मनस्थाप सहन करावा लागतो.

मुळातच आदिवासी बांधव लाजराबुजरा, घाबरट व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्यामुळे त्यांना प्रवेश क्षमता संपलेली असे सांगून प्रवेश देण्यास नकार देऊ नका. त्यावर तोडगा काढा व प्रत्येक आदिवासी व इतर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्या.

आदिवासी विद्यार्थी शिकला-सवरला तरच त्याच्या पुढील पिढीत बदल होईल व त्यालाही नोकरी-धंदा मिळून तोही स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहील त्यादृष्टीने प्रयत्न होणे ही काळाची गरज असल्याचे प्रामाणिक मत निकम यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in