पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग यंत्रणा बसवणार

पोलीस महासंचालक यांच्या ट्विटरवरून ऑडिओ रेकॉर्डिंगची यंत्रणा देखील लवकरच अपग्रेड केली जाईल असे सांगण्यात आले
 पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग यंत्रणा बसवणार

सर्वोच्च न्यायालयाने २०२० साली दिलेल्या आदेशानंतर राज्यातील पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ऑडिओ रेकॉर्डिंग यंत्रणा देखिल बसविण्याचे आदेशात नमूद असूनही कोणत्याच पोलीस ठण्यात ती अद्याप बसविण्यात आलेली नाही. या प्रकरणी तक्रार झाल्यावर पोलीस महासंचालक यांच्या ट्विटरवरून ऑडिओ रेकॉर्डिंगची यंत्रणा देखील लवकरच अपग्रेड केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

ज्या ज्या ठिकाणी तपास, चौकशी आदी प्रक्रिया केली जाते त्या केंद्रीय व राज्य तपास यंत्रणांच्या कार्यालयात सीसीटीव्ही सह ऑडियो रेकॉर्डिंग यंत्रणा लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने डिसेम्बर २०२० मध्ये दिले होते. सीसीटीव्ही व ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे त्या तपास यंत्रणांच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिक, पीडित तसेच आरोपी आदींना सौजन्याची वागणूक मिळण्यासह अन्याय वा गैरप्रकार, भ्रष्टाचारला सामोरे जावे लागणार नाही असा दिलासा त्या आदेशामुळे मिळेल अशी आशा निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात सुमारे १२०० पोलीस ठाणी असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या. परंतु सीसीटीव्ही बसवताना ऑडिओ रेकॉर्डिंग यंत्रणा मात्र बसवण्यात आली नाही. या प्रकरणी,माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्ण गुप्ता यांनी मीरा भाईंदर मधील नवघर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज व ऑडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली असता पोलिसां कडून सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. परंतु नवघर पोलिसांनी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाचा हवाला देत, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या काढण्यात आलेल्या कामात कॅमेऱ्या सह ऑडिओ सुविधा बसवणे नमूद नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज ऑडियो सह दिलेले नाहीत असे नवघर पोलिसांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in