जुन्या वादातून दोन मित्रांमध्ये हाणामारी

चौघांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून दोन मित्रांमध्ये हाणामारी

भिवंडी : दोन महिन्यांपूर्वीच्या जुन्या भांडणाच्या वादातून चार मित्रांनी आपसात संगनमताने मित्रालाच शिवीगाळ करीत बेदम मारहाण करून रक्तरंजित केल्याची घटना शहरातील एका मोहल्ल्यातून समोर आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान, जावेद बारीक, अल्ताफ, फरीद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, तर अली मतलुब शेख (१८) असे मारहाणीत जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेहान व जखमी अली हे दोघांचे मित्र असून दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. दरम्यान, १३ मार्च रोजी शांतीनगर परिसरातील किडवाईनगर रोड येथील नूर हॉटेलसमोरून अली जात असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून रेहानने त्यास अर्वाच्य भाषेत बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अलीने त्याचा जाब विचारताच रेहानच्या अन्य तीन मित्रांनी आपसात संगनमत करीत, अली यास शिवीगाळ करून चौघांनी लाकडी बांबू व हाताच्या ठोश्याबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत अलीला रक्तरंजित केले. त्यास उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीचा शांतीनगर पोलीस ठाण्यात अलीच्या फिर्यादीवरून १५ मार्च रोजी चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि एस. आय. गायकवाड करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in