अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी बाळ कोपरा उपक्रम होणार सुरु

या कोपऱ्यात क्षार, जीवनसत्वे व सुक्ष्म पोषक तत्वे असणारे खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहे
अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी बाळ कोपरा उपक्रम होणार सुरु

ग्रामीण भागातील कुपोषणाला आळा घालण्यासाठी शासनाच्या विविध योजनांसह ठाणे जिल्हा परिषद नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या संकल्पनेनुसार या आर्थिक वर्षात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी ‘बाळ कोपरा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत एक कोपरा तयार करून या कोपऱ्यात क्षार, जीवनसत्वे व सुक्ष्म पोषक तत्वे असणारे खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहे. हे खाद्यपदार्थ बालक स्वतःच्या हाताने खाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाचे राष्ट्रीय पोषण मंडळ यांच्या अहवालानुसार वयोगटाप्रमाणे क्षार, जीवनसत्वे व सुक्ष्म पोषक तत्वे आहारातुन मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना नियमित आहारा व्यतिरिक्त अतिरिक्त आहार उपलब्ध करून दिल्यास त्यांना योग्य ती प्रथिने व उष्मांक मिळून त्यांचे कुपोषण दुर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामध्ये अंगणवाडीमध्ये बालकांना नाचणीयुक्त बिस्कीट, राजगिरा स्लाईस, बिस्किट, खोबरा मिक्स वडी आदि अतिरिक्त आहार देण्याचे प्रस्तावित आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचा महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारीत ग्रामीण व आदिवासी भागामधील ०९ प्रकल्पातंर्गत एकुण १,८९४ केंद्रामध्ये ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील १,३१,३०७ मुले योजनेचा लाभ घेतात.विभागातंर्गत ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके व गरोदर स्तनदा माता यांना घरी नेऊन खाण्यायोग्य आहार देण्यात येते. तसेच ३ ते ६वर्षे वयोगटातील अंगणवाडीतील बालकांना अंगणवाडीमध्ये गरम ताजा आहार देण्यात येतो. अशी माहिती महिला व बाल विकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in