कल्याण : कल्याण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून, सरकार अद्याप त्यांच्या मागण्या मान्य करीत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
शनिवारी झालेल्या प्रज्ञा बुद्ध विहार समितीच्या हॉलमध्ये कल्याण तालुक्यातील ३५० हून अधिक अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या. या ठिकाणी सरकार विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या तसेच तीव्र मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे येथील उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक मुखाने निर्धार केला.
कल्याण तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गेल्या ४८ दिवसापासून आपल्या विविध मागण्यांकरिता काम बंद आंदोलन पुकारले आहे. परंतु या निगरगट्ट सरकारने अद्यापही या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने अंगणवाडी कर्मचारी चांगले संतापले आहेत.
या आंदोलनाला जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे, ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या आदेशाने कल्याण पश्चिम समन्वयक संदीप शेंडगे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात जिजाऊ संस्था सक्रिय सहभाग घेणार असल्याचे शेंडगे यांनी उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगितले. यावेळी वंदना बागुल, रूपाली पाटील, माया निकम, वंदना गजबे, योगिनी शिंदे, शशिकला मोरे, निकम पाटील, उषा रसाळ यांसह ३५० हून अधिक अंगणवाडी कर्मचारी व सदस्य समाजसेवक गौतम मोरे उपस्थित होते.