
ठाणे जिल्ह्याचे शिवसेना नेते, पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन बंडाचे बिगुल वाजवत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे. विशेष म्हणजे ठाण्याच्या राजकीय इतिहासात ठाकरे आणि शिवसेनेला शिंदेशाहीने दिलेला हा दुसरा झटका आहे. यापूर्वी १९७० च्या सुमारास शिवसेनेचे सहयोगी सदस्य असलेल्या मारोतराव शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसच्या मदतीने नगराध्यक्षपद मिळवले होते,आणि ठाण्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र काही दिवसांनी याच मारोतराव शिंदे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली आणि ते ठाकरेंच्या गळ्यातले ताईत झाले.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या वर्षभरात शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली तीही ठाण्यात! तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचे ठाणे शहराशी आगळे नाते निर्माण झाले. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली, ठाण्यात शिवसेनेची पहिली शाखा १ जानेवारी १९६७ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर काही दिवसातच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टांग्यातून फिरून निवडणूक प्रचार केला. या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांकडे ५० रुपयांची अनामत रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा घरोघरी जाऊन उमेदवार म्हणून उभे राहण्याचा अनेकांना आग्रह करावा लागला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख हेच पद आणि बाकीचे सारे शिवसैनिक किंवा फार तर शाखाप्रमुख असेच होते. बाळासाहेब स्वतः लोकलने प्रवास करत प्रचारासाठी ठाण्यात यायचे. १३ ऑगस्ट १९६७ ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक झाली आणि १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी पैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले. त्यामुळे शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला. या निवडणुकीत जनसंघाचे ८, प्रजासमाजवादीचे ३, अपक्ष ८ उमेदवार निवडून आले. ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी अॅड. अरविंद दीक्षित हे निवडून आले.
मारोतराव शिंदे यांनी दिला होता झटका
मारोतराव शिंदे हे ठाण्याच्या खारकर आळी प्रभागातून शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून निवडून आले होते. वसंत मराठे नगराध्यक्ष होते तर नगरपालिकेवर शासनाकडून सूर्यवंशी नावाचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र काही दिवसांनी सूर्यवंशी कामकाजात सहकार्य करत नसल्यामुळे शिवसेनकडून त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय झाला. शिवसेनेचे नगरसेवक आणि सहयोगी सदस्यांना ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश देण्यात आले मात्र मारोतराव शिंदे यांनी या अविश्वास ठरावाला जाहीर विरोध केला होता. त्याच दरम्यान ठाण्याच्या शिवाजी मैदानात झालेल्या सभेत आदेश न पाळणारा मारोतराव शिंदे कोण ? असा सवाल आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केला होता, मात्र त्यावेळी सभेला उपस्थित असलेले मारोतराव थेट मंचावर गेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर उभे राहून उघडपणे आपली भूमिका मांडण्याची हिम्मत दाखवली होती.
दरम्यान त्या काळात नव्याने राजकारणात आलेल्या शिवसेनेने आपला वेगळेपणा दाखवण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी जर कोणी नगरसेवक सेनेतून फुटला तर त्याची गाढवावरून धिंड काढली जाईल असा इशारा दिला होता. त्याकाळात या गाढवावरच्या धिंडीलाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आणि काही दिवसातच ठाण्यात पहिले सत्तांतर झाले. शिवसेनेचे सहयोगी सदस्य असलेल्या मारोतराव शिंदे यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र" केला आणि विरोधी पक्षांच्या मदतीने ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. त्या काळात शिवसेनेच्या ‘मार्मिक’ या मुखपत्राने मारोतराव शिंदे यांच्याविरोधात प्रचंड झोड उठवली होती. त्यावेळे ठाण्यातले वातावरण तंग झाले होते. पक्षांतराला प्रोत्साहन देणार्या कॉंग्रेसने शिंदे यांना संरक्षण दिले होते. मुळातच पैलवान असलेल्या मारोतराव शिंदे हे त्याकाळात धाडसाने शिवसेनेच्या विरोधाला सामोरे गेले होते.
मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तुर्क आसंगी गावचे सुपुत्र असलेले मारोतराव ठाण्यात आले त्यांनी ठाण्याच्या राजकरणात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या मारोतरावांनी ठाण्यातील पहिल्या मिनाज क्लिक या फोटो स्टुडिओची स्थापनाही केली होती. सुरूवातीला काही काळ बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे मतभेद होते नंतर मात्र त्या दोघांची चांगली मैत्री झाली.
एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेत सर्वात मोठे बंड
कधी काळी ठाण्यातील रस्त्यावर रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. २०१९ साली राज्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नसताना जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारची चर्चा सुरु झाली तेव्हा शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा मुखमंत्रीपदासाठी सुरु झाली होती. त्यांचे नाव व मुख्यमंत्री पदाच्या यादीत शेवटपर्यंत आघाडीवर होते. शेवटी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले मात्र या मंत्रिमंडळात नगरविकास हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मानाचे मंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आहेत.
ठाणे शहरात आल्यानंतर त्यांनी ११ वी पर्यंत शिक्षण ठाण्यातील मंगला हायस्कूल आणि जुनिअर कॉलेजमधून घेतले आणि नंतर उपजीविकेसाठी त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरूवातीला शाखाप्रमुख, नगरसेवक, महापालिकेत गटनेते, जिल्हाप्रमुख नंतर आमदार, जिल्हा संपर्क मंत्री,भाजप शिवसेनेची सत्ता येताच सुरवातीला विरोधी पक्ष नेते, शिवसेना नेतेपद, नंतर कॅबिनेट मंत्री, महाविकास आघाडीची सत्ता येत असताना सुरूवातीला मुख्यमंत्री पदाची चर्चा, नंतर राज्याच्या सरकारमध्ये क्रमांक २ चे नगरविकासमंत्री अशी महत्वाची पद शिवसेनेकडून दिली गेली असतानाही ४० पेक्षा जास्त आमदार फोडून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना दुसरा शिंदेशाही दणका दिला आहे.