शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी माजी महापौर नरेश म्हस्के यांची नियुक्ती

नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे
शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी माजी महापौर नरेश म्हस्के यांची नियुक्ती

ठाण्यातील शिंदे गटाची मुलुख मैदानी तोफ म्हणजे ओळखल्या जाणाऱ्या माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर म्हस्के हे अनेकवेळा शिंदेच्या बाजूने उभे असलेले पहायला मिळाले होते. एवढेच नव्हे तर मातोश्रीला देखील म्हस्के यांनी आव्हान दिले असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू भक्कम आणि विरोधकांना उत्तर देण्यासाठी म्हस्के यांची प्रवक्तेपदी निवड झाली असल्याचे सांगण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून सुरतेची वाट धरली तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले असले तरीही ठाण्यातून सगळ्यात आधी त्यांना आपला पाठींबा जाहीर करण्यात नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर ठाणे शिवसेनेतील मंडळींना शिंदे यांच्यासोबत आणण्यात देखील त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पडली होती.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेचा वर्षाव होत होता तेव्हा त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली तेव्हाही म्हस्के त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी केलेल्या जोरदार भाषणामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदासह शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यावर अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. सगळ्यात आधी त्यांनी नरेश म्हस्के यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदी पुनर्नियुक्ती करून हा निर्णय झुगारला, त्यानंतर राज्यभरात अनेक नियुक्त्या करण्यात आल्या.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीपक केसरकर हे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांच्याशिवाय किरण पावसकर, शीतल म्हात्रे यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यात आता नरेश म्हस्के यांचीही यापदी नियुक्ती केली गेल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बळ मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in