तीन महिन्यांत २५,३६८ कोटींच्या १० प्रकल्पांना मान्यता; सामंत

सामंत यांनी पत्रकार परिषदेत थेट १० प्रकल्पांची माहिती पत्रकारांना दिली.
तीन महिन्यांत २५,३६८ कोटींच्या १० प्रकल्पांना मान्यता; सामंत

वेदांता-फॉक्सकॉन व टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे-भाजप सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. आदित्य ठाकरे यांनी तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामाच मागितला आहे. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार करताना आमच्या सरकारने तीन महिन्यांत २५,३६८ कोटींच्या १० प्रकल्पांना मान्यता दिल्याचे सांगितले. सामंत यांनी पत्रकार परिषदेत थेट १० प्रकल्पांची माहिती पत्रकारांना दिली.तीन महिन्यांत २५,३६८ कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांना मान्यता दिली असून, या १० प्रकल्पांमुळे ७,४३० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या १० प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचेही यावेळी सामंत यांनी सांगितले.

मान्यता दिलेले १० प्रकल्प

१) मे. सिनारामस पल्प अॅण्ड पेपर प्रा. लि. (एशिया पेपर अॅण्ड पल्प) हा प्रकल्प रायगडमधील धेरंड येथे होणार असून, यामध्ये २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत होणार आहे. यामधून तीन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

२) सोलार इंडस्ट्रीज इंडिया लि. हा प्रकल्प नागपूरमधील काटोल तालुक्यात होणार आहे. या प्रकल्पात ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे व ८४० जणांना रोजगार मिळणार आहे.

३) महाराष्ट्र सिमलेस लि. हा प्रोजेक्ट रायगडमधील विलेभागड येथे होणार असून, यामध्ये ३७५ कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामुळे २०० जणांना रोजगार मिळणार आहे.

४) सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. हा प्रोजेक्ट अहमदनगरमधील रांजणखोल येथे होणार आहे. यामध्ये ६६२ कोटींची गुंतवणूक होणार आहे व १४२ जणांना रोजगार मिळणार आहे.

५) वरण बेवरेजेस लि. हा प्रकल्प अहमदनगरमधील सुपा येथे दोन फेजमध्ये होणार आहे. या प्रकल्पामध्ये ७७९.३४ कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामध्ये ४५० जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

६) विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लि. सोलापुरातील माढा तालुक्यातील म्हैसगावमध्ये हा प्रकल्प होणार असून, या प्रकल्पातून ५४८ जणांना नोकरी मिळणार आहे. १२६.३० कोटींचा हा प्रकल्प आहे.

७) आयएफबी रेफ्रिजरेटर्स लि. हा प्रकल्प पुण्यातील रांजणगावात होणार आहे. ७५० जणांना नोकरी मिळेल. हा प्रकल्प ४०० कोटींचा आहे.

८) जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट‌्स प्रा. लि. हा प्रकल्प जळगावमधील खडका येथे होणार आहे. यामध्ये ६५० कोटींची गुंतवणूक होणार असून, ६२५ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

९) मेगा प्राइप्स प्रा. लि. हा ७५८ कोटींचा प्रोजेक्ट रायगडमधील हेडवली येथे होणार आहे. या प्रकल्पामुळे ३७५ जणांना रोजगार मिळेल.

१०) ग्रासिम इंडस्ट्रिज लि. हा प्रकल्प रायगडमधील महाड येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ५०० जणांना रोजगार मिळणार आहे, तर १०४० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in