दसऱ्याचं सोनं जपायचं, तर आपटा वाचवायला हवा; आपट्याच्या घटत्या उपलब्धतेने निसर्ग संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर

दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं वाटण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र शहरीकरण, वृक्षतोड आणि नैसर्गिक अधिवासाच्या ऱ्हासामुळे आपट्याच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाजारात कांचनच्या पानांचीही विक्री होत असताना, सणाच्या उत्साहासोबत स्थानिक वृक्षसंपदा जपण्याची जबाबदारी ओळखण्याची गरज आहे.
दसऱ्याचं सोनं जपायचं, तर आपटा वाचवायला हवा; आपट्याच्या घटत्या उपलब्धतेने निसर्ग संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर
दसऱ्याचं सोनं जपायचं, तर आपटा वाचवायला हवा; आपट्याच्या घटत्या उपलब्धतेने निसर्ग संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर
Published on: 

ठाणे : दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं वाटण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र शहरीकरण, वृक्षतोड आणि नैसर्गिक अधिवासाच्या ऱ्हासामुळे आपट्याच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाजारात कांचनच्या पानांचीही विक्री होत असताना, सणाच्या उत्साहासोबत स्थानिक वृक्षसंपदा जपण्याची जबाबदारी ओळखण्याची गरज आहे.

आपटा आणि कांचन ही वेगवेगळी वृक्षप्रजाती आहेत. आपट्याची पानं तुलनेने लहान असतात, तर कांचनची पानं मोठी आणि रुंद असून त्यांचा आकार उंटाच्या खुरासारखा दिसतो. दसऱ्याच्या काळात या पानांमधील फरकाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सणासाठी मोठ्या प्रमाणात पानं गोळा करताना झाडांच्या फांद्यांची होणारी छाटणी आणि त्यामुळे वृक्षांना पोहोचणारी हानी. आपटा हा स्थानिक वृक्ष असून कोरड्या पानझडी वनांमध्येही आढळतो. त्याच्या विविध भागांचा पारंपरिक औषधी उपयोग केला जातो. मात्र, औषधी महत्त्वाबरोबरच या वृक्षाचं पर्यावरणीय स्थानही महत्त्वाचं आहे. वृक्षांमुळे पक्षी, कीटक आणि इतर सजीवांना अधिवास मिळतो. त्यामुळे स्थानिक वृक्षांचं संवर्धन म्हणजे जैवविविधतेचं संरक्षण करणंही महत्वाच असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ प्रशांत सिनकर यांनी सांगितले.

ठाण्यात स्थानिक वृक्षांचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान अधिक गंभीर बनत आहे. उद्यानं, शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संस्था आणि सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये आपट्यासारख्या स्थानिक वृक्षांची लागवड करण्याची गरज आहे. दसऱ्याच्या परंपरेला पर्यावरणपूरक दिशा देण्यासाठी पानं गोळा करताना झाडांना इजा होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. अनावश्यक फांद्या तोडण्याऐवजी मर्यादित प्रमाणात पानं गोळा करावीत.

दसऱ्याला सोनं वाटण्याची परंपरा जपतानाच निसर्गाचं सोनं असलेल्या वृक्षांचं रक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपटा टिकला, तरच परंपरेचं निसर्गाशी असलेलं नातं पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल.

डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक, ठाणे)

logo
marathi.freepressjournal.in