भिवंडी : दोन भाजीपाला विक्रेत्यांमध्ये भाजीपाल्याची गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून राडा होऊन एका विक्रेत्याने दुसऱ्याला लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. तर याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात दुसऱ्या भाजीपाला विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
शिवम किशोरीलाल केशरवाणी (१९) असे अटक केल्याचे नाव आहे. तर गौतम रमेशचंद जैस्वाल (१९) असे हल्ल्यात जखमी झालेल्या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी शिवम हा भिवंडी महापालिका परिसरातील काप आळीतील मोरे बिल्डिंगमध्ये राहत आहे. तर जखमी गौतम हा कोंबड पाड्यातील पंचवटीच्या बाजूकडील जिजामाता चाळीत भाड्याच्या खोलीत राहत आहे. या दोघांचाही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून दोघेही बाजारपेठेतील भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची गाडी लावत आहेत. दरम्यान १० सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास भाजी मार्केटमधील जय मल्हार हॉटेल समोर भाजीपाल्याचे दुकान लावण्याच्या जागेवरून दोघांमध्ये शिवीगाळसह धक्काबुक्कीने शाब्दिक बाचाबाची झाली.
त्यानंतर आरोपी शिवमने लाकडी बांबूच्या सहाय्याने मारहाण करून त्यास रक्तरंजित केले आहे.त्यामुळे याप्रकरणी जखमी गौतमच्या फिर्यादीवरून शिवमच्या विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि पाथरे करीत आहेत.