भिवंडी : २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश ठाणे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी भिवंडी परिमंडळ -२ क्षेत्रातील सर्वच पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुषंगाने निजामपूरा पोलीस ठाण्याचे वपोनि संतोष आव्हाड व पोनि दीपक शेलार (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सशस्त्रांसह दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या सराईत टोळीतील तिघांना पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहे.
सुफियान भद्रे आलम अन्सारी (१९), सोहेल सनाउल्लाह शेख (२६), नईम जमाल अहमद सय्यद (१९) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल करून ७८ हजार ८१० रुपये किमतीची विविध प्रकारची सशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांचे अन्य दोन साथीदार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भिवंडी पारोळ रस्त्यावरील तळवली नाका हद्दीत ५ ते ६ जण रिक्षातून सशस्त्रांसह फिरत असल्याची खबर पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने पोलीस पथकाने तळवली नाका येथील स्मशनभूमी जवळील रस्त्यावर सापळा रचला होता. त्यावेळी संशयित रिक्षा भरधाव वेगात जाताना दिसली. पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा अडवली. त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन रिक्षाची झाडाझडती करून अवैध देशी बनावटीचे अग्निशस्त्रे, जिवंत काडतूस व धारदार हत्यार असा एकूण ७८ हजार ८१० रुपये किमतीचा घातक साठा पोलिसांनी जप्त केला आहे.