मुरूड शहरात बिबट्याचे आगमन, वन विभागाकडे बिबट्याचा शोध घेण्याची मागणी

दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद. वन विभागातील एक अधिकारी यांनी प्रत्यक्ष या भागाला भेट देऊन पाहणी.
मुरूड शहरात बिबट्याचे आगमन, वन विभागाकडे बिबट्याचा शोध घेण्याची मागणी

मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढली असून आजूबाजूच्या जंगल भागात काहींना बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रकारे मुरूड शहरात सुद्धा बिबट्या आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे.

मुरूड शहरात बागायती जमिनी व खाजण भाग अधिक आहे. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे असल्याने त्याच्या शोधात बिबटे हे मुरूड शहरात दाखल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुरूड शहरातील बाजारपेठेच्या रस्त्यावर दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान बिबट्या मुक्त संचार करत असताना जाहिद फकजी यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले दिसून आले आहे. वन विभागातील एक अधिकारी यांनी प्रत्यक्ष या भागाला भेट देऊन पाहणी देखील केली आहे.

याबाबत दुकानदार आसोशिएशनचे अध्यक्ष जाहिद फकजी यांनी वनविभागाकडून एक अधिकारी येताे आणि थोडी पाहणी करून निघून जात असल्याचे म्हटले आहे. रविवारी दोन अधिकारी आले, त्यांना पाहणी करतेवेळी बिबट्या(मादी) पावलांचे ठसे आढळून आले आहे. तरी वनविभाग या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालत असल्याचे दिसत नसल्याचे फकजी यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर येथे सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत असतात, त्यामुळे अचानक बिबट्याने हल्ला केल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी वनविभागाने तातडीने स्पेशल टीमला प्रचारण करून बिबट्याला शोधून जेरबंद करावे, अशी मागणी जाहिद फकजी यांनी केली आहे.

आम्हाला या संदर्भात माहिती मिळाली असून कॅमेऱ्यामध्ये दिसत असलेला नक्की बिबट्या आहे का त्यांची पाहणी करत आहेत. मुरूड पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेराचे सर्व फुटेच पाहण्याचे काम ही चालू आहे. अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांना बिबट्या दिसून आल्यास जवळ न जाता वनभिगाची संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - प्रियांका पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी

logo
marathi.freepressjournal.in